BJP Flag Sarkarnama
विदर्भ

Chandrapur BJP: अडीच लाख मतांनी धुव्वा उडल्यानंतर भाजपनं 'गेम प्लॅन' बदलला; चंद्रपूर लोकसभेसाठी देणार कुणबी चेहरा?

Loksabha Election 2029: लोकसभेच्या 2024 निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात भाजपला अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीत कुणबी-बहुजन मतदारांचा घटक भाजपच्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्याचे राजकीय विश्लेषण केले जाते.

संजय तुमराम

Chandrapur News: लोकसभा निवडणुकीला अद्याप तीन वर्षांचा अवधी असला तरी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या संभाव्य उमेदवाराची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर भाजप आगामी निवडणुकीत कुणबी-बहुजन समाजातील उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी राजुरा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार देवराव भोंगळे यांचे नाव चर्चेत आले आहे. भोंगळे यांच्या अलीकडील राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांमुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.

लोकसभेच्या 2024 निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात भाजपला अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीत कुणबी-बहुजन मतदारांचा घटक भाजपच्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्याचे राजकीय विश्लेषण केले जाते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार निवडीचे समीकरण बदलणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

भाजप कुणबी-बहुजन चेहऱ्याला संधी देणार?

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2029 च्या निवडणुकीसाठी भाजप कुणबी-बहुजन समाजातील चेहऱ्याला संधी देऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर राजुराचे आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भोंगळे यांनी विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे. मात्र, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका उपक्रमाची विशेष चर्चा होत आहे.

संपूर्ण लोकसभा मतदारसंघात कार्यक्रम!

काही दिवसांपूर्वी देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात तब्बल 34 ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ त्यांच्या राजुरा विधानसभा मतदारसंघापुरता मर्यादित नव्हता. संपूर्ण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

एका विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदाराने संपूर्ण लोकसभा मतदारसंघात वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवल्याने त्याला राजकीय संदर्भ जोडला जात आहे. भोंगळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आतापासूनच जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन'

लोकसभा उमेदवारीच्या चर्चेवर आमदार देवराव भोंगळे यांनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या कामाच्या आणि जनतेच्या प्रेमाच्या जोरावर सरपंचपदापासून आज इथपर्यंत पोहोचलो आहे. यापुढेही पक्ष जी जबाबदारी देईल, ती पार पाडेन, असे भोंगळे यांनी स्पष्ट केले आहे.

भोंगळे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा थेट व्यक्त केलेली नसली, तरी पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे त्यांच्या संभाव्य लोकसभा उमेदवारीच्या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT