BJP Logo
BJP Logo Sarkarnama
विदर्भ

अंतर्गत गटबाजीमुळे जिल्हा परिषदेत भाजपला गवसेना गटनेता...

निलेश डोये

नागपूर : राजकीय पक्षात गटबाजी असू नये, एकवाक्यता असावी, असे प्रत्येक पक्षप्रमुखाला वाटते. पण गटबाजीची किड ही प्रत्येक पक्षात आहे. भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. या पक्षात पूर्वी गटबाजी नव्हती. पण जसजसा पक्ष मोठा होत गेला, तसतशी गटबाजी वाढत गेली. आता नागपूर जिल्हा परिषदेत याच गटबाजीमुळे भाजपला गटनेता गवसत नाहीये.

जिल्हा परिषदेत कॉंग्रेसने आपल्या गटनेतेपदी महिला सदस्याची नियुक्ती केली. त्याला आठवडाभराचा कालावधी उलटून गेला. मात्र भाजपमध्ये पक्ष नेत्यांच्या बैठकींवर बैठकी सुरू आहेत. परंतु अद्याप गटनेता कुणाला करावे, यावर नेत्यांचे एकमत झालेले नाही, असे सूत्र सांगतात. पक्षातील अंतर्गत गटबाजीत गटनेत्याची निवड अडकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी प्रशासनाने कार्यक्रम जाहीर केल्याने सुरुवातीला राजकीय घडामोडींना वेग आला. परंतु, राज्य सरकारकडून कोणतेही मार्गदर्शन न मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही निवडणूक स्थगित केली. त्यामुळे राजकीय घडामोडी थंडावल्या. परंतु कॉंग्रेसने आपला गटनेता जाहीर केला. विशेष म्हणजे एकदाच बैठक घेतल्यानंतर गट नेतेपदी अवंतिका लेकुरवाळे यांची निवड करण्यात आली. भाजप पक्ष नेत्यांच्या दोन -चार बैठका झाल्याचे सांगण्यात येते. परंतु गट नेता जाहीर करण्यात आला नाही.

हा विषय प्रथम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींकडे पाठविण्यात आला. ‘पोट निवडणुकीत विचारले नाही. आता हरल्यावर विचारणा कशाला करता’, असे म्हणत गडकरींनी जिल्‍ह्यातील नेत्यांना चांगलेच खडसावले आणि या विषयातून गडकरींनी हात काढून घेतल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. गटनेता निवडीवरून भाजपमध्ये गटबाजी सुरू असल्याची कुजबुज सुरू झाली आहे. माजी गट नेते अनिल निधान यांच्या अनुपस्थित काम पाहणारे उपगटनेते व्यंकट कारेमोरे यांच्यासोबत आतिश उमरे व कैलास बरबटे यांच्या नावांची गटनेता पदासाठी चर्चा आहे.

आमदार समीर मेघे, माजी ऊर्जामंत्री, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांना त्यांच्या मर्जीतील नेता हवा असल्याची जोरदार चर्चा जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात आहे. गटबाजीमुळे हा विषय दिल्ली दरबारी जाणार, अशी मिश्‍कीलीसुद्धा रंगू लागली आहे. उपाध्यक्षपदासाठी १२ नोव्हेंबरला निवडणूक आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच हा विषय मार्गी लागेल, असे सध्यातरी दिसतेय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT