Atul Londhe
Atul Londhe Sarkarnama
विदर्भ

Atul Londhe: ‘ती’ चूक भाजपने मुद्दामहून केली, कारण त्यांना धार्मिक शांतता भंग करायची आहे !

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : कुख्यात आतंकवादी याकूब मेनन याच्या मजारचे सुशोभीकरण केल्यावरून आता क्रिया-प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. याकूब मेननचे शव त्याच्या कुटुंबीयांना द्यायलाच नको होते, ते दिले गेले. ही तेव्हाच्या भाजप सरकारची चूक होती, नव्हे ती चूक त्यांनी मुद्दामहून केली होती, असा घणाघात महाराष्ट्र (Maharashtra) प्रदेश कॉंग्रेसचे (Congress) मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

यासंदर्भात बोलताना लोंढे (Atul Londhe) म्हणाले, सर्वात पहिली चूक भारतीय जनता पक्षाने केली आणि ही चूक त्यांनी मुद्दामहून केली. कारण भाजपला (BJP) या देशात धार्मिक शांतता नांदू द्यायचीच नाहीये. युपीए सरकारच्या काळात दोन कुख्यात आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा दिली गेली होती. त्यातील एक होता अफजल गुरू आणि दुसरा अजमल कसाब. त्यांचे शव त्यांच्या कुटुंबीयांना दिले गेले नव्हते. ते शव एका विशिष्ट ठिकाणी गाडल्या गेले होते.

अमेरिकेच्या कमांडोंनी जेव्हा ओसामा बीन लादेनला मारले होते, तेव्हा त्याचे शव समुद्राच्या आत गाडण्यात आले होते. जेणेकरून त्यांची मजार बांधली जाऊ नये आणि भविष्यात त्यावर कुणी राजकारण करू नये. पण याकूब मेननला जेव्हा फाशीची शिक्षा दिली गेली, तेव्हा त्याचे शव त्याच्या कुटुंबीयांना दिले गेले. त्याच्या अंत्ययात्रेमध्ये मोठ्या संख्येने लोक आले होते. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार होते. भाजपने तेव्हा या सर्व परवानग्या दिल्या होत्या. त्यामध्ये त्यांचा राजकीय फायदा होता. त्यामुळे आता भाजपने या गोष्टीचे उत्तर दिले पाहिजे, असेही अतुल लोंढे म्हणाले.

या देशाला धर्मांध बनविण्याचे पाप भाजप करीत आहे. आता याकूब मेननच्या मजारचा राजकीय फायदा घेतला जात असेल तर याची सर्वस्वी जबाबदारी भाजपची आहे. ही बाब भाजप नेत्यांना कळत नाही, असे नाही. पण ते नेहमी आपला राजकीय फायदा बघतात, असा घणाघाती आरोप अतुल लोंढे यांनी केला. याकूब मेनन सारख्या कुख्यात आतंकवाद्यांचे शव त्यांच्या कुटुंबीयांना देऊ नये, असे धोरण केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून तयार करायला हवे, असेही लोंढे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT