Wardha
Wardha Sarkarnama
विदर्भ

Wardha जिल्ह्यात कॉंग्रेसचा गढ पोखरून भाजपने जोडला नवा मतदार...

रुपेश खैरी

Grampanchayat Election Results Analysis : वर्धा (Wardha) जिल्ह्यात ११३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी घेतली. त्यांच्याकरिता ग्रामीण भागात मतदार वाढविणारी ही निवडणूक ठरली. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या नाकर्तेंपणामुळे त्यांच्या घरात भाजपने विजय मिळविल्याने काँग्रेसजणांवर चिंतन करणे आणि कारणे शोधण्याची वेळ या निवडणुकीने आणली आहे.

काँग्रेसचा (Congress) गढ म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात भाजपने (BJP) चांगलेच पाय रोवल्याचे झालेल्या या निवडणुकीतून (Election) पुढे आले आहे. निवडणूक जरी चिन्हावर लढली नसली तरी ५० टक्क्यांपेक्षा अधिक जागांवर भाजपने दावा केला आहे. हा दावा मोडण्याकरिता काँग्रेसकडून कुठलेही प्रयत्न होत नसल्याने जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी भाजपसमोर नांगी टाकल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि इतर पक्षाच्या तुलनेत अपक्षांनी मिळविलेल्या ग्रामपंचायती अधिक आहे. यामुळे काँग्रेसचा गढ असलेल्या जिल्ह्यात गत वैभव मिळविण्यासाठी काँग्रेस जणांनी एकत्र येत नवी मोट बांधण्याची वेळ आली आहे. याकडे काँग्रेसच्या प्रदेश कमिटीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

येत्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर या ग्रामपंचायतच्या निवडणुकांना विशेष महत्त्व होते. देशात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेचा या निवडणुकांवर प्रभाव पडेल असे वाटत होते. केवळ काँग्रेसच्या नेत्यांच्या उदासिन धोरणामुळे जिल्ह्यात हे चित्र आहे. यातून नेतृत्वाने वेळीच धडा न घेता नवे निर्णय घेतले नाही तर जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नावालाही उरले नाही तर नवल नको.

घरातील मुसंडीने काँग्रेसला मत सांभाळण्याचे आव्हान..

देशात भाजपची लाट असताना देवळी-पुलगाव मतदार संघ काँग्रेसने राखला. पण, झालेल्या निवडणुकीत देवळीत भाजपने मुसंडी मारल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे. याला कारण काँग्रेसचे येथील नेते आमदार रणजित कांबळे यांचे हेकेखोर धोरण जबाबदार असल्याची चर्चा मतदार संघात आहे. गत तीन दशकांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत यंदा भाजपने बळकावल्याने आता ग्रामीण भागातील मत सांभाळण्याचे आवाहन काँग्रेससमोर आले आहे. देवळीच नाही तर जिल्ह्यातही काँग्रेसची तीच स्थिती आहे. पिपरी ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या उमेदवारासाठी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही जोर लावला. पण, येथे भाजप समर्थिताने बाजी मारल्याने येथेही काँग्रेसवर कारणे शोधण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात सहकाराचा जोर होतोय कमी..

एका काळात वर्ध्यात आमदार देणाऱ्या सहकार क्षेत्राला पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसला वर्धा तालुक्यात एकही जागा मिळाली नाही. तर सहकार क्षेत्राच्या जोरावर हिंगणघाट-समुद्रपूर विधानसभेतही पक्षाला विशेष लाभ मिळाला नाही. येथे भाजपने चांगलीच आघाडी घेतली. या तालुक्यात आमदार समीर कुणावार यांना रोखण्याचे आव्हाण घेत काँग्रेसमध्ये गेलेल्या माजी मंत्री अशोक शिंदे यांना सध्या तरी ते शक्य नसल्याचे येथील राजकीय जाणकार सांगत आहेत. तर सहकार नेते अॅड. सुधीर कोठारी यांच्याही शब्दाला किंमत नसल्याचे या निवडणुकीतून समोर आल्याचे काही राजकीय जाणकार सांगत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT