Dhangar Reservation : भाजपच्या गटातून आपण आमदार असलो तरी अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण रस्त्यावर उतरत आंदोलन करीत आहोत. सरकारकडे मागणी आहे की त्यांनी धनगर समाजाला तात्काळ आरक्षण द्यावं, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरू आहे. सोमवारी (ता. 11) धनगर समाजाचा प्रचंड मोठा मोर्चा विधानसभवनावर धडकला. पोलिसांनी झिरो माइल्स चौकातील मोर्चा पॉइंटवर आमदार पडळकर आणि मोर्चेकऱ्यांना अडवले. भाजपचे राज्यसभा सदस्य खासदार डॉ. विकास महात्मे हे देखील मोर्चात सहभागी झाले होते.
पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर आमदार पडळकर, खासदार डॉ. महात्मे यांच्यासह धनगर समाजातील नेत्यांनी झिरो माइल्स चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. ‘एकच मिशन, धनगर आरक्षण’ असं लिहिलेल्या पिवळ्या रंगाच्या टोप्या, पिवळे झेंडै आणि पिवळे दुपट्टे घातलेल्या नेते व मोर्चेकऱ्यांनी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले.
यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, सरकारकडे धनगर समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. धनगर समाजावर गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय होत आहे. त्यामुळं हा समाज आता रस्त्यावर उतरला आहे. आता सरकारने तात्काळ आरक्षणाची अंमलबजावणी करावी. धनगर आणि धनगड हा मुद्दाही तातडीनं सोडवावा. धनगर समाजाला नव्याने कोणतेही आरक्षण नकोय. धनगर समाजाला पूर्वीपासूनच आरक्षण मिळाले आहे. 1956 मध्ये जी यादी तयार झाली आहे, त्यात धनगर समाजाचा समावेश आहे. गेल्या 67 वर्षांपासून दाखल्यांचा विषय प्रलंबित आहे. अनुसूचित जमातीच्या दाखल्याचा हा मुद्दा आहे. तो दाखला मिळावा अशी समाजाची अपेक्षा आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
धनगर समाज आता पिवळ्या ध्वजाखाली एकवटला आहे. धनगर समाजाने नेहमीच सरकारला साथ दिली आहे. मात्र कोणत्याही पक्षाने किंवा सरकारने धनगर समाजाला न्याय दिलेला नाही. त्यामुळे सकल धनगर समाज आता आपल्या मागण्यांसाठी विधान भवनावर धडकला आहे. आम्ही सरकारला इशारा देत आहोत. त्यांनी धनगर समाजाचे प्रश्न सोडवावे. धनगर समाजाचा सत्तेतील वाटा खुपच कमी आहे. आपण जरी आमदार असलो, सत्तेत असलो तरी मर्यादा आहेत. मोर्चात आपण सत्ताधारी आमदार या नात्याने नव्हे तर धनगर समाजातील घटक म्हणुन सहभागी झाल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले. सरकारने आता कोणताही वेळ न गमावता धनगरांच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा परिणामांसाठी तयार राहावे, असा इशाराही आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.