भंडारा : एका शाळेच्या प्रकरणात पोलिस अधीक्षक जाधव यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर विविध कलमांद्वारे गुन्हे दाखल केले होते. भोंडेकर हे शिवसेना समर्थीत आमदार आहेत. तेव्हा त्यांची सत्ता नव्हती. पण आता शिंदे (Eknath Shinde) गटात जाऊन सत्ता येताच त्यांनी सुडाचे राजकारण सुरू केल्याची ओरड जिल्ह्यात सुरू झाली आहे.
राज्यात सत्ता परिवर्तन होऊन महिना होत नाही तोच भंडारा (Bhandara) पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आमदार भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) यांच्या तक्रारीवरून ही बदली झाल्याचे बोलले जात आहे. जानेवारी २०२१ ला कोरोना काळात शालेय शुल्कावरून भंडाऱ्यातील एका शाळेबाबत पालकांची ओरड सुरू झाली होती. ही बाब लक्षात घेता आमदार भोंडेकर यांनी शाळेत पालकांसोबत जाऊन जाब विचारला होता. तेव्हा शाळा समिती व भोंडेकर यांच्यात प्रचंड वाद झाला होता. त्यातून झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात पोलिस (Police) अधीक्षक वसंत जाधव यांनी भोंडेकर यांच्या विरोधात कलम १४३, १४७, १४८, ५०४, ५०६, ३२३ मुंबई पोलिस कायदा १३५ नुसार गुन्हा नोंद केला होता.
तेव्हापासून पोलिस अधीक्षक वसंत जाधव आणि आमदार भोंडेकर यांच्यात वाद सुरू झाला होता. आमदार भोंडेकर यांनी मागील अधिवेशनात पोलिस अधीक्षकांची तक्रार केली होती. दरम्यान राजकीय घडामोडींनंतर भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आले. आमदार भोंडेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील निघाल्याने पोलिस अधीक्षक वसंत जाधव बदल निश्चित मानली जात होती. अखेर आज पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांचा बदलीचा आदेश येऊन धडकला. त्यांची बदली कुठे झाली, याचा उल्लेख आदेशात नाही. तर याबाबत स्वतंत्र आदेश निघणार आदेशात नमूद केले आहे. पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांच्या बदलीनंतर नागपूरचे डीसीपी लोहित मतानी भंडारा पोलिस अधीक्षक म्हणून येणार असल्याची माहिती आहे.
वसंत जाधव यांच्या बदलीमुळे भंडारा पोलिस विभागात नाराजीचा सूर आहे. आमदार भोंडेकर सुडाचे राजकारण करत असून वसंत जाधव यांचा कालावधी शिल्लक असताना बदली केल्याने सरकारने या आदेशाचा फेरविचार करावा, अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांच्यापेक्षा अधिक कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून लोहित मतानी यांच्याकडे बघितले जाते. त्यामुळे आताही आता मतानी आणि भोंडेकर यांचे सूर जुळेल की नाही, हाच प्रश्न आता विचारला जात आहे. यासंदर्भात आमदार भोंडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, यामध्ये सुडाचा कुठलाही भाग नाही, तर ही पोलिस विभागाची कारवाई आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच प्रस्तावित झाली होती. फक्त आदेश आता या सरकारच्या काळात निघाला आहे, असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.