Nana Patole
Nana Patole Sarkarnama
विदर्भ

भाजपने संविधान धाब्यावर बसवले, आता अन्यायाविरुद्ध पेटून उठा...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : केंद्रातील भाजप सरकार ओबीसींच्या विरोधात उभे ठाकले आहे. आमच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. संविधानाने दिलेले अधिकारसुद्धा केंद्र सरकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आता या अन्यायाविरुद्ध पेटून उठा, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ओबीसी नेते नाना पटोले यांनी आज केले.

शेगाव येथे ओबीसी (OBC) समाज अधिकार संमेलन पार पडले. यावेळी नाना पटोले (Nana Patole) बोलत होते. इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) विविध मागण्या केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत, पण केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार (BJP) जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करून ओबीसी समाजावर अन्याय करत आहे. संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत. पण केंद्रातील सरकार संविधान धाब्यावर बसवून काम करत आहे. असे नाना पटोले यांनी म्हटले.

या संमेलनाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, (Bhupesh Baghel) महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, (Yashomati Thakur) अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व पंजाबचे सहप्रभारी हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉ. बबनराव तायवाडे, आमदार अमित झनक, आमदार राजेश एकडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे, माजी आमदार दिलीप सानंदा, प्रदेश सरचिटणीस शाम उमाळकर, स्वाती वाकेकर, रवी महाले, मंगेश भारसाखळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, आजचे हे संमेलन केंद्र सरकारला इशारा देण्यासाठी आहे. ओबीसींचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत आणि ते न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करु. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला केंद्र सरकारकडील डाटा ९८ टक्के अचूक आहे, पण ते देत नाहीत. जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, महात्मा फुले व सावित्रीबाई यांनी देशाला दिशा देण्याचे काम केले. पण त्यांचा अपमान करण्याचे धाडस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले, महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही. ओबीसी समाजासाठी मी सदैव संघर्ष करत आलो आहे आणि आपले हक्क मिळवण्यासाठी यापुढेही संघर्ष करत राहू. ओबीसी समाजाच्या समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेटून त्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करु, असे नाना पटोले म्हणाले.

राम नाम जपना, पराया माल अपना..

यावेळी बोलताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल म्हणाले की, ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आपण लढा देत आहोत पण भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार आरक्षणविरोधी आहे. आरक्षणाचा फायदा सरकारी नोकऱ्यांमध्ये होतो. परंतु केंद्र सरकारने सरकारी मालकीच्या कंपन्याच विकायला काढल्या आहेत. रेल्वे, विमानतळ, एअर इंडियासारखे उपक्रम विकून टाकत आहे. हे सरकारी उपक्रमच राहिले नाहीत तर आरक्षणाचा लाभ कसा मिळणार? आरक्षणाचा लाभ मिळू नये म्हणूनच भाजप सरकार हे सरकारी उपक्रम विकत आहे.

आरक्षण मिळू नये म्हणून मोठे षड्यंत्र रचले जात आहे. म्हणूनच आरक्षणाच्या लढ्याबरोबरच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम विकू नये, यासाठीसुद्धा लढा दिला पाहिजे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या विकल्या की तुमचे आरक्षण गेले. तुम्हाला कमकुवत करण्याचा हा डाव आहे. राम नाम जपना, पराया माल अपना, हा भाजपचा मूलमंत्र आहे. काँग्रेस नेहमीच एससी, एसटी, ओबीसी समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे आणि यापुढेही राहील, असे भुपेश बघेल म्हणाले. महिला व बाल कल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, राष्ट्रीय सरचिटणीस आशिष दुआ तसेच ओबीसी महासंघाचे डॉ. बबनराव तायवाडे यांनीही संमेलनाला संबोधित केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT