Eknath Shinde Shivsena BJP
Eknath Shinde Shivsena BJP Sarkarnama
विदर्भ

भाजपने शिंदेंच्या बंडखोरीतून मारला एक तीर, पण साधणार दोन निशाणे !

अतुल मेहेरे

नागपूर : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीच्या मागे भारतीय जनता पक्षाचाच हात आहे, असे सर्वत्र बोलले जात आहे. पण भाजपने अद्याप ही बाब पुढे होऊन मान्य केलेली नाही. पण ही चर्चा येवढ्यावर थांबलेली नाही, तर भाजपनेच या बंडाळीचा तीर मारला आहे आणि यातून दोन निशाणे साध्य करणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेतील (Shivsena) आजवरच्या सर्वात मोठ्या या बंडखोरीच्या मागे भाजपचाच (BJP) हात आहे, हे एव्हाना सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या षड्यंत्रात भाजपचा कुणी मोठा नेता सहभागी असल्याचे वाटत नाही, असे म्हटले होते. दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी यामागे भाजपचाच हात असल्याकडे सूचक इशारा केला होता. हे राजकारण काहीही असो, पण भाजपनेच शिवसेना फोडली, हे या लहान मुलगासुद्धा सांगेल. पण अद्याप भाजपचा एकही नेता या प्रकरणात पुढे आलेला नाही. त्यामुळे या बाबीला अधिकृत दुजोरा मिळत नाही.

शिवसेना फोडून महाराष्ट्रात सत्ता हस्तगत करणे आणि पुढील महिन्यात होऊ घातलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आपल्या पारड्यातील मते वाढवून घेणे, असा दुहेरी उद्देश भाजपचा असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. कारण राष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडे पुरेशी मते नाही किंवा ऐन वेळी मते कमी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देवेंद्र फडणवीस गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. त्यामुळे भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांनी राष्ट्रपती निवडणुकीची ही योग्य वेळ साधली आहे. महाराष्ट्रात सत्ता येईल आणि राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील सरळ सरळ ४५ ते ५० मते आपल्याकडे वळती करता येतील, हा भाजपचा डाव असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे.

भाजपचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार पराभूत झाल्यास महाराष्ट्रात राज्यपालपदी भगतसिंह कोश्‍यारी असताना महाविकास आघाडी सरकारची जी गत झाली होती, तीच भाजप सरकारची दिल्लीत होणार आहे आणि भाजपला तसा धोका पत्करायचा नाहीये. त्यामुळेच पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून महाराष्ट्रात राजकीय भूकंप आणल्याचेही जाणकार सांगतात. भाजपची ही खेळी जवळपास यशस्वी झाल्यासारखी दिसते आहे. पण पाऊस, क्रिकेट आणि राजकारण यात शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल, हे कधीच सांगता येत नाही. यामध्ये भल्याभल्यांचे अंदाज चुकतात. महाविकास आघाडीच्या बाजूने शरद पवार किल्ला लढवत आहेत आणि ते केव्हा काय करतील, याचा अंदाज कुणालाही येत नाही. २०१९ मध्ये त्यांनी काय केले, हे आजही देशभरातील जनतेच्या लक्षात आहे. या प्रकरणातही क्षणोक्षणी उत्कंठा शिगेला पोहोचत आहे. एकंदरीतच पुढे काय होईल, हे पाहणे निश्‍चित औत्सुक्याचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT