NCP Sharad Pawar faction Sarkarnama
विदर्भ

Buldhana Drought : दुष्काळावरून बुलढाण्यात राजकारण तापलं; पालकमंत्री ‘हरवले’ म्हणत पोलिसांत तक्रार

Buldhana drought row intensifies as NCP Sharad Pawar faction files a police complaint against the guardian ministers : 18 दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत बुलढाण्याचा समावेश नसल्याचा विरोधकांचा दावा; शेतकऱ्यांच्या बांधावर न आल्याचा मकरंद पाटील आणि संजय सावकारेंवर आरोप

Pradeep Pendhare

NCP Sharad Pawar faction : बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

‘पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे हरवले आहेत’, असा उपरोधिक आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय बागडे आणि त्यांच्या समर्थकांनी खामगाव पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीमुळे बुलढाण्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने राज्यातील 18 जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून (NCP SP) करण्यात आला आहे. मात्र, बुलढाणा जिल्ह्याचा त्यात समावेश करण्यात आलेला नाही, यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात शेतकरी संकटात असताना पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नसल्याचा आरोप संजय बागडे यांनी केला. ‘पालकमंत्री शहरात फिरत आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर दिसत नाहीत. त्यामुळे ते हरवले आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे,’ असा दावा करत त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडे तक्रार केल्याचे बागडे यांनी सांगितले.

सोयाबीन, कपाशीच्या नुकसानीचा दावा

दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील सोयाबीन आणि कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला आहे. पिके जळून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. ‘शेतकरी अडचणीत असताना त्यांच्यासोबत उभे राहण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची आहे. मात्र, ते कुठे आहेत, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे,’ असे संजय बागडे यांनी म्हटले आहे.

दीड महिन्यापासून जिल्ह्यात आले नाहीत

पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे हे मागील दीड महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यात फिरकले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राजकीय रंग चढला

दरम्यान, ‘पालकमंत्री शोधून द्या’ अशी मागणी करत पोलिसांकडे तक्रार देण्यात आल्याने दुष्काळाच्या मुद्द्याला आता राजकीय रंग चढला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आगामी काळात आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT