Ambadas Danve
Ambadas Danve Sarkarnama
विदर्भ

Ambadas Danve : ठाकरे परिवाराला टार्गेट करून सरकार पडले तोंडघशी...

अजय धर्मपुरीवार

Maharashtra Assembly Winger Session : नागपूर (Nagpur) हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने सरकारच्या नाकातोंडात पाणी भरले. यामुळे मुख्य प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या परिवाराला टार्गेट केले जात आहे. मात्र शिंदे - फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारच तोंडघशी पडले आहे. कर्नाटक सीमा वादाचा ठराव सत्ताधाऱ्यांनी अजुनही मांडला नाही. यामुळे २६ डिसेंबर रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून (Shivsena) हा ठराव सभागृहात मांडण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिली.

हिंगणा तहसील कार्यालयासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने झोपडपट्टी व शेतकऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे द्यावे, यासाठी माजी पंचायत समिती उपसभापती विलास भोंबले यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आज भेट देण्यासाठी आले असताना पत्रकारांशी ते बोलत होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुढे म्हणाले, नागपूर हिवाळी अधिवेशनाला आठवडा पूर्ण झाला आहे. महाविकास आघाडी विरोधी पक्षात असली तरी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी विरोधी पक्षांनी सरकारला अनेक प्रश्न मांडून धारेवर धरले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूखंडाचा श्रीखंड हा प्रश्नसुद्धा होता. यानंतर कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना सरकारकडून अद्यापही ठाम भूमिका घेतली जात नाही. आठवडा लोटूनही कर्नाटक सीमावादाचा ठराव सरकारने मांडला नाही. राज्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडविताना सरकारला अपयश आल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवाराला टार्गेट करण्याचं काम सरकारने केले. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी ठाकरे परिवाराचा मुद्दा हेतुपुरस्सर सभागृहात उपस्थित करण्यात आला. मात्र या परिवारावर कितीही आघात केले तरी हा परिवार चट्टाणासारखा मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्नाटक सीमावादाचा प्रश्न चिघळला असतानाही नागपूर अधिवेशनाचा आठवडा लोटुनही याबाबतचा ठराव घेण्यात आला नाही. हे शिंदे- फडणवीस सरकारचं अपयश आहे. कर्नाटक सरकारला एक इंचही महाराष्ट्रातील जमीन देण्यात येऊ नये, असा ठराव २३ डिसेंबरला शिवसेनेकडून मांडण्यात येणार होता. मात्र आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने सभागृह स्थगित झाले. यामुळे हा ठराव सभागृहात मांडता आला नाही. मात्र हा ठराव २६ डिसेंबर रोजी विधान परिषदेत मांडण्यात येणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली.

शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या प्रश्नांसह मिहानमधील उद्योग सरकारने गुजरात मध्ये पळवले. याबाबत सरकारला अधिवेशनाच्या काळात जाब विचारण्यात येणार आहे. मिहान प्रकल्पात नवीन मोठे उद्योग आणण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याची टीका दानवे यांनी सरते शेवटी केली. यावेळी शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव, जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे, हिंगणा तालुकाप्रमुख जगदीश कन्हेर, विभाग प्रमुख राजेंद्र कोल्हे, शहर प्रमुख विष्णू कोल्हे, युवा सेनेचे संतोष कन्हेर, पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास भोंबले, महिला आघाडीच्या दीपलक्ष्मी लाड उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT