Nana Patole Sarkarnama
विदर्भ

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल..

मनोज भिवगडे

अकोला ः भारत बंदसाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात येथे मोर्चा काढण्यात आला होता. येथील स्वराज भवनमधून भव्य रॅली निघाली होती. यावेळी पटोलेंनी चालविलेल्या ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसले होते. त्यामुळे पटोलेंच्या विरोधात सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘भारत बंद’च्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये कायद्याचा भंग केल्याप्रकरणी पटोले यांच्यासह १५० जणांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ सप्टेंबर रोजी स्वराज भवन येथून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. दरम्यान पटोले यांनी रॅलीमध्ये ऑटो चालवला. या ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक बसले होते. तसेच त्या ऑटोला चहूबाजूंनी कार्यकर्ते लटकले होते.

कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता रॅली काढल्याने पोलिसांनी पटोले यांच्यासह साजीद खान मन्नान खान पठाण, राजेश भारती, बबनराव चौधरी, इलीयास ऊर्फ गुड्डू अलीयार खान पठाण, अविनाश देशमुख, अंशुमन देशमुख, सागर कावरे, मोहम्मद ब्रदुजमा, मोन्टु खान, महेश सुधाकर गणगणे, आकाश कवळे, शे.नवेद शे.इब्राहिम, निखीलेश दिवेकर, सुभाष कोरपे, पराग मधुकर कांबळे, अक्षय राजू इमानदार, डॉ. जिशान अजहर हुसैन यांच्यासह १०० ते १५० जण आणि ऑटोमध्ये बसलेल्या लोकांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी ३७ (१) (३) मुंबई पोलीस अधिनियम १९५१ प्रमाणे आदेश पारीत केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना कोणत्याही फिजीकल डिस्टन्सींगचे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन केले नाही. या साथीच्या रोगाचा फैलाव होईल, असे कृत्य केल्याने त्यांच्याविरुद्ध कलम १८८, २६९, २७० भादंवि १३५ बीपी अॅक्ट तसेच साथीचे रोग अधिनियम १८९७ कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नाना पटोले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेस महाराष्ट्रात अधिक आक्रमक झाली आहे. नाना पटोले यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकली. मोर्चे, आंदोलने यांची संख्या वाढली. पण त्यामुळे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होण्याचेही प्रमाण वाढले आहे.

अकोल्याच्या सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर नाना पटोले यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आक्रमक स्वभावाचे पटोले यावर निश्‍चितच बोलतील आणि त्यानंतर पुन्हा राजकीय धुरळा उडेल, असेही सांगितले जात आहे. निवडणुका असल्याने विरोधक पटोलेंवर निशाणा साधण्याची संधी घेतील का, असाही प्रश्‍न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT