Dr. Ashish Deshmukh and MP Dr. Shashi Tharur.
Dr. Ashish Deshmukh and MP Dr. Shashi Tharur. Sarkarnama
विदर्भ

Shashi Tharur : पक्षातील केंद्रीकरण थांबवायचे आणि सामान्य कार्यकर्त्यांना वाव द्यायचा आहे !

Atul Mehere

नागपूर : माझ्या उमेदवारीसंदर्भात मी तिन्ही गांधींसोबत बोललो आहे. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक निष्पक्षपणे व्हावी ही गांधी परिवाराचीही इच्छा आहे. या निवडणुकीत तेसुद्धा निष्पक्ष राहणार आहेत. यानिमित्ताने एक चांगली निवडणूक व्हावी, जेणेकरून कॉंग्रेस पक्ष मजबूत झाला पाहिजे आणि हे स्वतः आमच्या पक्षाच्या अध्यक्ष म्हणत आहेत. त्यामुळे ही निवडणूक लढण्यावरून माझ्या मनात कुठलीही शंका नाही, असे कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचे उमेदवार खासदार डॉ. शशी थरूर (MP Dr. Shashi Tharur) म्हणाले.

नागपुरातील (Nagpur) दिक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना अभिवादन केल्यानंतर थरूर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कॉंग्रेस (Congress) नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) त्यांच्यासोबत होते. कॉंग्रेसने जवळपास ५१ वर्षांनंतर अध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीचा उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांच्या रूपाने दिला, याबद्दल विचारले असता, ते म्हणाले, ही निवडणूक म्हणजे आमच्या सहकाऱ्यांमध्ये होत असलेली प्रक्रिया आहे. हे काही युद्ध नाही, यामध्ये कुणी शत्रू नाही. जनतेला आम्ही आमचे संकल्प सांगून जनतेचे समर्थन मिळविण्याचा आम्हा सर्वांचाच प्रयत्न आहे. शेवटी लोकांना माहिती आहे, की संकटांपासून मी कधी दूर गेलो नाही, तर त्याचा सामना केला आहे.

१२ प्रदेशांतील अनेक कार्यकर्त्यांनी मला सांगितले की, तुम्ही अध्यक्षपदाची निवडणूक लढवा. कारण त्यांना पक्षामध्ये बदल हवा आहे. त्यांचा आवाज, युवक कॉंग्रेसचाही आवाज बनण्याचा माझा प्रयत्न आहे. या निवडणुकीत ९,१५० इतके मतदान आहे. १७ ऑक्टोबरला मतदान होणार आहे आणि जास्तीत जास्त मते मिळतील, असा विश्‍वास असल्याचे थरूर यांनी सांगितले. जर निवडून येण्याचा विश्‍वास नसता, तर आज मी येथे उभा नसतो, असेही ते म्हणाले.

मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक जिंकण्याचा पूर्ण विश्‍वास आहे. म्हणून त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. याबद्दल बोलताना थरूर म्हणाले, त्यांना आत्मविश्‍वास आहे, ही चांगली गोष्ट आहे. माझ्या बाबतीत मीसुद्धा आश्‍वस्थ आहे. कारण पक्षामध्ये माझं ऐकणारे भरपूर लोक आहेत. खरगे यांच्यासोबत पक्षाचे सर्व मोठे नेते आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला विजयाचा विश्‍वास आहे का, असे विचारले असता, माझ्या समर्थनार्थ १२ पेक्षा जास्त प्रदेशांतील सामान्य कार्यकर्ते आले होते. तेच खरी पक्षाची ताकद आहेत. पक्षातले केंद्रीकरण थांबवायचे आहे आणि जिल्हा आणि तालुका स्तरावरील सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना जास्त वाव देण्याचा प्रयत्न माझा असणार आहे, असे शशी थरूर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT