Hansaraj Ahir Sarkarnama
विदर्भ

Chandrapur BJP News : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना अजूनही उमेदवारी मिळण्याची आशा; म्हणाले, मी मैदानात आहे !

Sudhir Mungantiwar : चंद्रपूर लोकसभेकरिता राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव आघाडीवर सुरू आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा नाही, पण पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढविण्याचे संकेत मुनगंटीवारांनी दिले आहेत.

संदीप रायपूरे

Chandrapur BJP News : लोकसभा निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने तर "चार सौ पार"चा नारा देत निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. एक-एक जागा जिंकण्यासाठी त्यांनी रणनीती अवलंबिली आहे. काल भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शाह यांनी अकोला येथे विदर्भातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यानंतर आता आधीच सक्रिय असलेले अनेक मतदारसंघातील नेते आता ॲक्शन मोडवर आले आहेत.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे माजी खासदार हंसराज अहीर यांनी आता मी अजूनही मैदानात आहे, असे सांगितले. चंद्रपूर लोकसभेकरिता राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव आघाडीवर सुरू आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा नाही, पण पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढविण्याचे संकेत मुनगंटीवारांनी दिले आहेत. अशा स्थितीतही अहीर यांनी अद्यापही आशा सोडलेली नाही.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजपने मोठी फिल्डिंग लावली आहे. मागील निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे हंसराज अहीर यांचा ऐनवेळी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या बाळू धानोरकर यांनी पराभव केला. अहीर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून तब्बल चारदा विजय मिळविला, पण एका नवख्या उमेदवाराने त्यांना चीत केल्याने हा पराभव त्यांना चांगलाच जिव्हारी लागला. चंद्रपुरातील जागा जिंकली असती तर महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करण्याचे भाजपचे स्वप्न साकार झाले असते, पण धानोरकरांनी भाजपचे ते स्वप्न धुळीस मिळवले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी एनडीए चारशेहून जास्त जागा जिंकेल अशी गॅरंटी दिली. त्यांची गॅरंटी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी देशात भाजप पूर्ण शक्तीनिशी कामाला लागली आहे. नुकतीच भाजपने आपल्या 195 उमेदवारांची यादी घोषित केली. यात अनेक मातब्बरांना घरचा रस्ता दाखविल्या गेला. अशावेळी चंद्रपुरातून पराभवाचा सामना करणाऱ्या हंसराज अहीर यांचा पत्ता कट होऊ शकतो. याची दाट शक्यता आहे, पण अहीर अद्यापही उमेदवारी मिळणार म्हणून प्रचंड आशावादी आहेत. यासंदर्भात आज (ता. 6) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून मी चार वेळा निवडून आलो. पक्षाने आपणांवर वारंवार विश्वास दाखविला. उमेदवारी देताना पक्षाने माझी जात बघितली नाही. या वेळी पुन्हा आपण चंद्रपूर लोकसभेची जागा जरूर जिंकू. आपण पक्षाशी नेहमीच एकनिष्ठ राहिलो. येत्या निवडणुकीत आपणाला पुन्हा संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चंद्रपुरात भाजपचे सुधीर मुनगंटीवार व हंसराज अहीर हे दोघे महत्त्वाचे शिलेदार आहेत. पण या दोघांमध्ये विशेष सौख्य नाही. याची प्रचिती वेळोवेळी आली आहे.

भाजप मुनगंटीवारांनाच लोकसभेच्या आखाड्यात उतरविणार असल्याचे बोलले जात आहे. अशावेळी अहीर यांना मात्र उमेदवारी आपणालाच मिळेल अशी आशा आहे. काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार किंवा त्यांची कन्या शिवाणी वडेट्टीवार व प्रतिभा धानोरकर आमने-सामने आहेत. अशात भाजपमध्येही वेगळे चित्र नाही. येत्या दोन दिवसांत भाजप आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करणार आहे. यात महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. अशात भाजप चंद्रपूर मतदारसंघात कुणाला उमेदवारी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT