Subhash Dhote and Pratibha Dhanorkar Sarkarnama
विदर्भ

Chandrapur Congress News : कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांनी हाणून पाडला आमदार धानोरकरांना एकटं पाडण्याचा प्रयत्न!

MLA Subhash Dhote : कळलाव्या नारद कोण, हे आमदार धोटे यांच्या लक्षात आले.

सरकारनामा ब्यूरो

Local MLA Dhanorkar was dropped : खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना पक्षात एकटं पाडण्याचा सुरू असलेला प्रयत्न कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी हाणून पाडला. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या वरोरा येथील परिसरात दादासाहेब देवतळे शेतकरी भवनाचे लोकार्पण आणि सहकार मेळावा आज (ता. ११) आयोजित केला होता. (Vijay Vadettiwar also did not turn up for the scheduled event)

निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार धानोरकरांना डावलण्यात आले. त्यामुळे आमदार धोटे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविण्याचा निर्णय घेतला. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनीही जाणे टाळले. राज्याचे विधानसभेतील विरोधीत पक्षनेते विजय वडेट्टीवार हेसुद्धा नियोजित कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत.

खासदार धानोरकर हयात असताना त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कथित गैरव्यवहाराबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे सत्ताधारी संचालकांनी त्यांना नेहमीच डावलले. मध्यंतरी बॅंकेत आयोजित एका मेळाव्यात संचालक रवि शिंदे यांनी खासदारकीचा उमेदवार बदला. अन्यथा त्यांना पाडू अशी जाहीर धमकी आमदार धोटे आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत दिली होती. त्यानंतर धोटे यांनीच शिंदे यांचा समाचार घेतला होता.

‘ते कॉंग्रेसचे नाहीत. त्यामुळे आमच्या पक्षांतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचा त्यांना अधिकार नाही’, या शब्दांत शिंदेंना फटकारले. दरम्यानच्या काळात खासदार धानोरकर यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना पद्धतशीरपणे पक्षात एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यांना अनेक कार्यक्रमात डावलण्यात आले. त्यांच्या मतदारसंघात स्वपक्षाच्या नेत्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. तो अजूनही सुरुच आहे.

त्यावेळी धोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभेच्या उमेदवारीवर धानोरकर कुटुंबीयांचा पहिला हक्क आहे. उमेदवार चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातीलच असावा, असे सांगून या नेत्याची हवा काढली. झाल्या प्रकारच्या तक्रारीसुद्धा वरिष्ठापर्यंत पोहोचल्या. त्यामुळे या तक्रारीच्या बराच कळा या नेत्यांना सोसाव्या लागल्या. त्यामुळे आता पुन्हा नव्या तक्रारींचा पाऊस नको, म्हणून जिल्ह्यातील नेते सावध झाले आहेत.

मात्र कॉंग्रेसमधील अंतर्गत मतभेदाचा लाभ उचलून आग लावण्याचा प्रयत्न काहींनी सुरुच ठेवला आहे. याचे प्रतिबिंब दादासाहेब देवतळे शेतकरी भवन लोकार्पण कार्यक्रमाच्या पत्रिकेत उमटले. कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार धोटे आणि आमदार अडबाले यांना निमंत्रित करण्यात आले. स्थानिक आमदार धानोरकर यांना जाणीवपूर्वक डावलले. एवढेच नव्हे वरोऱ्याचे रहिवासी असलेले जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक दामोधर रुयारकर यांनाही निमंत्रण पत्रिकेत स्थान देण्यात आले नाही.

याउलट बॅंकेशी कोणतीही संबंध नसलेले लक्ष्मीनगर धनोजे कुणबी समाज मंडळ या एका वॅार्डा पुरत्या मर्यादित संघटनेचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण पत्रिकेत स्थान देण्यात आले. ही पत्रिका बघताच हा पक्षांतर्गत भांडण लावण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. यामागचा कळलाव्या नारद कोण, हे आमदार धोटे यांच्या लक्षात आले. त्यांनी वडेट्टीवारांशी संपर्क केला. आपण या कार्यक्रमाला जाणार नाही, असे स्पष्ट केले.

वडेट्टीवारांनीही (Vijay Wadettiwar) या कार्यक्रमाकडे पाठ फिरविण्याचा निर्णय घेतला. कॉँग्रेस समर्थीत आमदार अडबाले यांनीही जाणे टाळले. सुभाष धोटे आणि अडबाले आज चंद्रपुरातच (Chandrapur) होते. विरोधी पक्षनेत्यांसह दोन्ही आमदारांनी बहिष्कार टाकला आणि पक्षात दुहीचे बीज पेरण्याचा कार्यक्रमाला चपराक लावली. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत स्वतः ला कॉंग्रसी समजतात.

त्यांनाही स्थानिक आमदारांचा विसर पडला कसा, असा प्रश्न बॅंकेतील कॉंग्रेस (Congress) विचारसरणीच्या संचालकांना पडला. अध्यक्षांसह चार-पाच संचालकांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळ्याचा सोपस्कार पार पडला. आम्ही गेलो नाही, असे सांगत आमदार धोटे यांनी यावर अधिक बोलण्याचे टाळले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT