Pratibha Dhanorkar and Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

Chandrapur Lok Sabha Election : आताही घराणेशाहीच चालवता, विकासावर कधी बोलणार ?

Balu Dhanorkar : बाळू धानोरकर हे वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे 2014 पूर्वी पाच वर्षे आमदार होते. त्‍यानंतर 2019 मध्‍ये त्‍यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवली.

सरकारनामा ब्यूरो

Chandrapur Lok Sabha Election : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांचा मुकाबला भाजपचे हेविवेट नेते, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत होत आहे. मुनगंटीवार यांना गेल्या ३०-३५ वर्षांच्या राजकारणाचा तगडा अनुभव आहे. तुलनेत धानोरकर या नवख्या ठरतात. आता आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने चंद्रपुरातही घराणेशाहीचा कित्ता गिरवल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशात चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातील नागरिक कोणाला कौल देणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काँग्रेसवर चंद्रपुरात घराणेशाहीचा आरोप होत आहे. काँग्रेसने केलेल्या घराणेशाहीमुळे देशाचे मोठे नुकसान झाल्याचा प्रचार होत आहे. अशात भाजपकडून मुनगंटीवार यांनी आतापर्यंत केलेल्या विकासकामांच्या आधारावर प्रचार करण्यात येत आहे.

चंद्रपूर-वरोरा-वणी-आर्णी मतदारसंघात 2014 पासून धानोरकर परिवाराचे वर्चस्व आहे. बाळू धानोरकर हे वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे 2014 पूर्वी पाच वर्षे आमदार होते. त्‍यानंतर 2019 मध्‍ये त्‍यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवली.

खासदार म्‍हणून निवडून आल्‍यानंतर रिकाम्‍या झालेल्‍या वरोरा-भ्रदावतीच्‍या आमदाराच्‍या जागेवर इतर कोणत्‍याही योग्‍य उमेदवाराला संधी न देता काँग्रेसकडून धानोरकर यांच्याच पत्‍नी प्रतिभा धानोरकर यांची वर्णी लावण्यात आली. बाळू धानोरकर यांचे भाऊ व प्रतिभा धानोरकर यांचे दीर गेल्या अनेक वर्षांपासून भद्रावतीच्‍या नगराध्‍यक्ष पदावर आहेत. बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर कॉंग्रेसने पुन्हा एकदा प्रतिभा धानोरकर यांच्‍या माध्‍यमातून घराणेशाहीला खतपाणी घालण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसच्या नेत्यांनी आतापर्यंत चंद्रपूरचा किती विकास केला, किती रोजगार निर्माण केला, किती मोठे प्रकल्‍प आणले, चंद्रपुरात किती गुंतवणूक आणली या प्रश्‍नांची उत्तरे त्यांना द्यावी लागणार आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्‍ला असलेल्‍या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, त्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनीही उमेदवारी मागितली होती.

प्रतिभा धानोरकर यांना भावनिक आधारावर जास्त मते मिळू शकतात, याचा विचार करीत काँग्रेसच्याच नेत्यांनी वडेट्टीवार यांचे खच्चीकरण करीत धानोरकर यांना संधी दिली आहे. सहानुभूती आणि भावनांच्या आधारावर काँग्रेस अजून किती काळ लढणार, असा सवाल भाजप नेत्यांनी केला आहे. काँग्रेसचा चंद्रपुरात भावनिक मुद्द्यावरच प्रचार सध्या सुरू आहे, तर भाजपने विकासात्मक मुद्दे पुढे केले आहेत.

सुधीर मुनगंटीवार पहिल्यांदा आमदार झाल्यापासून आजपर्यंत त्यांनी चंद्रपूरच्या कानाकोपऱ्यात केलेल्या कामांचा फोटो, व्हिडिओ, डिजिटल बुकच्या पुराव्यांसह लेखाजोखा मांडण्याचे काम भाजप करीत आहे. चंद्रपुरात झालेला दृश्य विकास येथील मतदारांनाही दिसत आहे. अशात भाजपनेही मतदारांना विकासाच्या मुद्द्यावर साद घातली आहे. जातीपातीचे, व्यक्तीच्या सहानुभूतीचे राजकारण किती दिवस करणार, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आहे. देशातील सध्याची परिस्थिती पाहता केंद्रातही नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. अशात विकासकामे करून घ्यायची असल्यास योग्य व्यक्तीलाच मतदान करावे लागेल, हे सर्वच मतदार जाणतात. असे असतानाही मोदी लाटेत बाळू धानोरकर यांच्या रूपाने काँग्रेसने एकमेव जागेवर यश मिळविले होते. त्यामुळे लोकशाहीत मतदारांचाच कौल महत्त्वाचा ठरतो हे सिद्ध झाले. यंदा चंद्रपूरचा मतदार कोणाला कौल देतो, याची उत्सुकता आहे.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT