BJP leaders announce election strategy and key appointments for Chandrapur Municipal Corporation polls. Sarkarnama
विदर्भ

Sudhir Mungantiwar : नगरपालिकेतील दणक्यानंतर भाजपला खडबडून जाग; सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा ताकद, CM फडणवीसांच्या भेटीनंतर लगेचच फिरली सूत्र

Sudhir Mungantiwar : चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाणार असून, भाजपने किशोर जोरगेवार, चैनसुख संचेती आणि अशोक नेते यांची प्रमुख जबाबदाऱ्यांवर नियुक्ती केली आहे.

सरकारनामा ब्युरो

Sudhir Mungantiwar news : चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात होईल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले असून, निवडणूक प्रमुख म्हणून आमदार किशोर जोरगेवार यांची नियुक्ती केली आहे. तसेच निवडणूक निरीक्षक म्हणून खासदार चैनसुख संचेती आणि निवडणूक प्रभारी म्हणून अशोक नेते यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर मुनगंटीवार यांनी पक्ष नेतृत्वाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पक्षाने आपली ताकद कमी केल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर लगेचच मुनगंटीवार-जोरगेवार वादाचा फटका महापालिका निवडणुकीत बसू नये म्हणून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी हा निर्णय घेतला आहे.

भाजपमध्ये घमासान सुरु झाल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांना जबाबदारी देण्यात येणार नाही, अशी चर्चा होती. या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सामोरे यावे लागले. त्यांनी पत्र काढून सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात निवडणूक होईल असे स्पष्ट करतानाच जोरगेवार यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली.

आजवर जिल्ह्याचे नेते म्हणून सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपने महानगरपालिका निवडणूक लढवली होती. त्यावेळी मुनगंटीवार यांच्याकडे पालकमंत्रिपदही होते. मात्र, पुढे मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. तसेच त्यांचा विरोध डावलून जोरगेवारांना भाजपात प्रवेश देण्यात आला. तेव्हापासून या दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली.

नगरपरिषद निवडणुकीत जोरगेवार आणि मुनगंटीवार दोघांनाही फटका बसला. त्यावरून दोघांनी एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. निवडणुकीनंतर लगेच पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्‍घाटनाचा वाद उफाळून आला. सरसंघचालकांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्‍घाटन होऊ नये यासाठी जोगरेवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला होता.

रवींद्र चव्हाण यांचा पुढाकार

त्यातच नगरपालिकेतील पराभवामुळे जोरगेवार यांच्याकडे पालिका निवडणुकीची जबाबदारी दिली जाणार नाही, अशाही चर्चा सुरू झाली. याचा फटका महानगरपालिकेच्या निवडणुकीत बसू शकतो हे लक्षात येताच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेत या वादावर पडदा टाकला. यात मुनगंटीवार आणि जोरगेवार हे दोघेही नेते दुखावणार नाहीत, अशी काळजी घेण्यात आली. मात्र, यानंतरही हे नेते एकत्र राहतील काय याबाबत साशंकता आहेत. तसेच मार्गदर्शकपद मोठे की निवडणूक प्रमुखपद यावरूनही वाद होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT