Vijay Wadettiwar and others Sarkarnama
विदर्भ

Chandrapur OBC Andolan: सर्वपक्षीय ओबीसींची बैठक घ्या; ताकत कळेल, असं का म्हणाले वडेट्टीवार?

संदीप रायपूरे

Chandrapur District Political News : गेल्या ११ सप्टेंबरपासून ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. सोळा दिवस लोटूनही अद्याप तोडगा निघाला नाही. दरम्यान, आज राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.

या वेळी त्यांनी आंदोलनकर्ते व ओबीसी महासंघाच्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. हे सरकार नालायक असल्याचा आरोप नुकताच त्यांनी केला होता. यामुळे या सरकारकडून अपेक्षा ठेवणे गैर असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व पक्षांत असलेल्या ओबीसींनी एकत्र येणे गरजेचे आहे. यासाठी सर्वपक्षीय बैठक घेऊन प्रभावीपणे त्याचे नियोजन करावे लागेल, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी. ओबीसीकरिता असलेली राज्यातील ७२ वसतिगृह तातडीने सुरू करावीत. स्वाधार योजनेची अंमलबजावणी करावी. सोबतच कुठल्याच स्थितीत ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये आदी मागण्यांसाठी ओबीसी युवक महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे गेल्या ११ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. त्यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे.

टोंगे यांच्या समर्थनात चंद्रपुरात मुंडन व भीक मांगो आंदोलन करण्यात आले. यानंतर संतप्त झालेल्या ओबीसी बांधवांनी चंद्रपूर-नागपूर महामार्ग रोखून सरकारचा जाहीर निषेध केला. ओबीसी महासंघाच्या वतीने चंद्रपुरात महामोर्चा काढण्यात आला. यात विविध संघटनांनी सहभाग घेतला. दरम्यान, महामोर्चानंतर राज्याचे वनमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलनस्थळाला भेट दिली.

यावेळी मुनगंटीवार यांनी तब्बल दोन तास चर्चा केली. पण त्यांची शिष्टाई कामात आली नाही. दरम्यान, अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या रवींद्र टोंगेंची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांना उपचाराकरिता वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यानंतर संतापलेल्या ओबींसींनी चंद्रपुरात नेत्यांच्या घरावर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना मध्येच रोखले.

टोंगेच्या तब्येतीत सुधारणा होत असून, त्यांच्याऐवजी आता दोघांनी अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवले. दरम्यान, परवा जिल्ह्यातील १५ तालुक्यांत लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. येत्या ३० सप्टेंबर रोजी ओबीसींनी जिल्हा बंदची हाक दिली आहे. दरम्यान, आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आंदोलन स्थळाला भेट दिली. आपल्या मागण्या मान्य करण्याकरिता संपूर्ण ओबीसी बांधवांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

विविध पक्षांतील ओबीसींनी राजकीय पक्षांचे हेवेदावे सोडून समाजासाठी सर्वपक्षीय बैठक घेऊन नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी दिली. या वेळी विजय वडेट्टीवार यांच्यासोबत नंदू नागरकर, रजिम शेख, कुणाल चहारे, मुन्ना तावाडे करीम शेख कुणाल गाडगे, शालिनी भगत, विनोद वाघमारे यांची उपस्थिती होती.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT