Chandrashekhar Bawankule  Sarkarnama
विदर्भ

BJP Politics : वोट चोरीच्या वादात बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य, थेट नागपूर महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांचा आकडाच जाहीर केला

Chandrashekhar Bawankule claims BJP win : राज्यात सध्या वोट चोरीचा मुद्दा गाजत असताना भाजप नेत्यांच्या विविध वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यामुळे विरोधकांनीही शंका व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

Rajesh Charpe

Summary :

  • राज्यात वोट चोरीच्या चर्चेतच बावनकुळे यांनी नागपूर महापालिकेत भाजपचे 120 नगरसेवक निवडून येतील असा दावा केला.

  • या वक्तव्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेवर शंका उपस्थित होत असून विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे.

  • नागपूरच्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाबाबत आता जोरदार चर्चा रंगत आहे.

Nagpur News : सध्या राज्यात वोट चोरीचा मुद्दा तापत असून भाजप नेत्यांच्या दाव्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे. ते बोलतात तेवढेच लोकप्रतिनिधी तंतोतंत निवडून कसे काय येतात? असा सवाल व्यक्त केला जात आहे. असे असताना शनिवारी राज्याचे महसूलमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर महापालिकेत निवडून येणाऱ्या नगरसेवकांचा आकडाच जाहीर केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नागपूर महापालिकेत यंदा भाजपचे 120 नगरसेवक निवडून येणार असल्याचा दावा त्यांनी केलाय.

नागपूरमधील बडकस चौकातील जन्माष्टमीनिमित्त आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात बावनकुळे यांनी उपरोक्त आकडा जाहीर केला. मध्य नागपूरचे भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बावनकुळे यांच्या भाषणामुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच जोष निर्माण झाला होता. यावेळी बावनकुळे एवढ्यावरच थांबले नाहीत.

ते म्हणाले, मध्य नागपूरमध्ये विरोधकांचा एकही नगरसेवक निवडून येणार नाही. आपले पूर्ण त्यांचे शून्य असा संकल्प करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहात चांगलीच भर पडली होती. बावनकुळे मंचावर येताच त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोष भरण्यास सुरुवात केली. आपल्या भाषणाला सुरुवात करताच त्यांनी पहिला प्रश्न डिसेंबर, जानेवारी महिन्यात काय आहे अशी विचारणा केली. प्रेक्षकांमधून महापालिकेची निवडणूक असा प्रतिसाद येताच त्यांनी आपल्याला काय करायचे आहे अशी विचारणा केली.

ते म्हणाले, यावेळी महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याला आणखी मोठ्या विक्रमाची नोंद करायची आहे. यावेळी आपले 120 नगरसेवक निवडून येणार आहे. त्यामुळे तुम्ही कामाला लागा असे ते म्हणाले. मध्य नागपूरमध्ये आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात आपल्याला निवडणूक लढायची आहे, आज जन्माष्टमीचा भंडारा घ्या आणि उद्यापासून निवडणुकीच्या कामाला लागा असेही ते म्हणाले.

विशेष म्हणजे यापूर्वीच्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 108 नगरसेवक निवडून आले होते. नागपूर महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात भाजपला प्रथमच स्वबळावर सत्ता स्थापन करता आली होती. 2017ची महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आटोपताच भाजपचे तत्कालीन शहर अध्यक्ष, माजी आमदार सुधाकर कोहळे आणि आमदार प्रवीण दटके यांनी 108 नगरसेवक निवडून येतील असा दावा केला होता. त्या दाव्यानंतर तंतोतंत तेवढेच नगरसेवक भाजपचे निवडून आले होते, हे विशेष. त्यावेळी सर्वांचा अंदाज 80 ते 85 नगरसेवक निवडून येतील असेच राजकीय चित्र शहरात होते. भाजप नेत्यांनी सांगितलेला आकडा अचूक ठरल्याने आजही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

FAQs :

प्र.१: बावनकुळे यांनी काय दावा केला आहे?
उ: त्यांनी नागपूर महापालिकेत भाजपचे 120 नगरसेवक निवडून येतील असा दावा केला आहे.

प्र.२: या वक्तव्यावर वाद का निर्माण झाला?
उ: राज्यात सध्या वोट चोरीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा आकडा जाहीर केल्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे.

प्र.३: नागपूर महापालिकेतील निवडणूक कधी होणार आहे?
उ: अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, मात्र राजकीय अंदाज वर्तवले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT