विदर्भ

Yavatmal People got Angry : पोलिसांनी कामाला लागावं , आमच्या पालकमंत्र्यांना शोधून काढावं

Police Complaint : मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी दाखल केली लेखी तक्रार

सतीश हरिश्चंद्र येटरे

Protest of Farmer's : गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध असंतोष धगधगत आहेत. अलीकडेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, नेत्या सुषमा अंधारे यांनीही वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथं येऊन संजय राठोड यांच्यावर टीका केली होती. वाशीम आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यात सध्या राठोड दिसत नसल्यानं त्यांचे विरोधक तर सक्रिय झाले आहेतच शिवाय त्यांचा पालकजिल्हा असलेल्या यवतमाळमध्येही नाराजी वाढत चाललीय.

ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी अडचणींचा सामना करीत असताना पालकमंत्री गायब असल्यानं संजय राठोड बेपत्ता असल्याची तक्रार मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पोलिसांत दाखल केलीय. जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, सिंचनाची असुविधा, वन्यप्राण्यांचा हैदोस यामुळं त्रस्त आहे. (Complaint in Police regarding missing of Yavatmal Guardian Minister Sanjay Rathod, a leader from Eknath Shinde Group)

अडचणीत असलेल्या शेतकरी, नागरिकांच्या तक्रारी शासनाच्या दरबारी मांडण्यासाठी पालकमंत्री दुवा असतो. परंतु यवतमाळमध्ये संजय राठोड दिसत नसल्यानं आपली कैफियत ऐकण्यासाठी कुणालाही वेळ नसल्याचा संताप शेतकऱ्यांमध्ये वाढतोय. यातूनच अशोक धोबे, सुधाकर धोबे, प्रमोद खिरटकर, माणिक पांगुळ, संजय पारखी, नानाजी डाखरे, विजय धानोरकर , दौलत बदखल, सुरेंद्र काकडे, प्रमोद खंडाळकर, भास्कर दानखडे, संजय येरमे, नंदेश्वर आसुटकर आदी शेतकऱ्यांनी थेट मारेगाव पोलिस ठाण्यात पालकमंत्री हरविल्याची तक्रार दाखल केलीय.

शासन, प्रशासन शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याचं यावेळी शेतकऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांजवळ नमूद केलं. पालकमंत्री संजय राठोड हे केवळ आपल्या मतदारसंघातील नागरिकांसाठीच उपलब्ध असतात, असा आरोप या शेतकऱ्यांनी यावेळी केला. दिग्रस, दारव्हा, नेर या तीन तालुक्यातच त्यांचे सतत दौरे, असतात. त्यामुळं त्यांना केवळ तीन तालुक्यांचं पालकमंत्री घोषित करावं, अशी टीकाही या शेतकऱ्यांनी केली. यवतमाळ हा क्षेत्रफळ आणि तालुक्याच्या संख्येच्या दृष्टीने विदर्भातील मोठा जिल्हा आहे. त्यामुळं राठोड यांनी सर्वत्र समान लक्ष द्यावं अशी मागणी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मारेगाव येथील शेतकऱ्यांनी केलेल्या या आंदोलनाची चर्चा संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात झाली. शेतकरी पोलिसांत तक्रार देत असतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल माध्यमांवर चांगलेच व्हायरल झालेत. रात्री उशिरापर्यंत मात्र यासंदर्भात पालकमंत्री संजय राठोड किंवा त्यांच्या समर्थकांकडुन कोणताही खुलासा करण्यात आला नव्हता. यासंदर्भात राठोड यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळं राठोड यांच्याभोवती पुन्हा एकदा चर्चेचं वलय निर्माण झालय.

(Edited By : Prasannaa Jakate)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT