नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळेंचे औक्षण केले. त्यानंतर गडकरींच्या घरून ते अर्ज भरण्यासाठी निघाले. बावनकुळे गडकरींचे कट्टर समर्थक आहेत. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत पक्षानं तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्यावर बरीच संकटं आली. पण सध्या बावनकुळेंना पक्षाने पुन्हा संधी दली आहे.
भाजपने 2019 मध्ये त्यांची उमेदवारी कठोरतेने कापली. महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी भाजपचे संसदीय मंडळ बसले होते. स्वतः नितीन गडकरी या मंडळात होते. आपल्या समर्थकाला उमेदवारी पक्ष देत नसल्याचे पाहून गडकरी त्या बैठकीतून कोणाशीही न बोलता बाहेर पडले होते. त्यानंतर बावनकुळेंच्या पत्नीला उमेदवारी मिळावी, अशी पक्षश्रेष्ठींना गळ घालण्यात आली होती. मात्र तेथेही पक्षाचे नेते कठोर राहिले. अर्ज भरण्यासाठी गेलेल्या बावनकुळेंच्या पत्नींना माघारी फिरावे लागले. त्यामुळे बावनकुळे हे राजकीय विजनवासात गेल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली. तसे न होता दोन वर्षानंतर बावनकुळेंना पक्षाने विधान परिषदेसाठी उमेदवार म्हणून निवडले आहे.
कांचनताईंनी चंद्रशेखर आणि सौ ज्योती बावनकुळे औक्षण केले तेव्हा सौ. पायल आष्टनकर व लोकेश आष्टनकर आणि संकेत बावनकुळे उपस्थित होते. यानंतर बावनकुळे नेते, कार्यकर्ते वाट बघत असलेल्या आकाशवाणी चौकात गेले. तेथे जाऊन माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे यांच्यासोबत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. यावेळी तेथे खासदार रामदास तडस आणि महापौर दयाशंकर तिवारी त्यांच्या सोबत होते. यावेळी नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. हार अर्पण झाल्यानंतर बावनकुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले.
बावनकुळे हे नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक कसे बनले, याचाही किस्सा आहे. राजकारणात येण्यापूर्वी बावनकुळे शेतकरी, सामान्य लोकांसाठी लढायचे, आंदोलनं करायचे. तेव्हा एका आंदोलनादरम्यान त्यांनी नितीन गडकरी यांचा ताफा अडवला होता. तेव्हा पहिल्यांदा गडकरींची नजर बावनकुळेंवर पडली. त्याच्या काही काळानंतर त्यांनी गडकरींच्या नेतृत्वात राजकारणात प्रवेश घेतला. राजकारणात आल्यापासून बावनकुळे गडकरींचे खंदे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या नेतृत्वावर बावनकुळेंची प्रगाढ श्रद्धा आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कापल्यानंतरही त्यांची गडकरींवरील श्रद्धा तसुभरही कमी झाली नाही.
गेल्या निवडणुकीत तिकीट नाकारले गेल्यानंतरही बावनकुळेंनी पक्षाचे काम अव्याहतपणे सुरू ठेवले. नंतरच्या काळात त्यांना महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली, तीसुद्धा त्यांनी निष्ठेने पार पाडली आणि आजही पाडत आहेत. ‘पक्षाने मला खूप काही दिले. सामान्य कार्यकर्त्यापासून जिल्हा परिषद सदस्य, विरोधी पक्षनेता, आमदारकी, कॅबिनेट मंत्रिपद सर्व काही दिले आणि एक वेळा तिकीट दिले नाही म्हणून आपल्याच पक्षाचा विरोध थोडी करायचा असतो’, असे म्हणत पक्षाने सोपविलेली प्रत्येक जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन ते पक्षकार्य करीत राहिले. हे काम पक्षाने लक्षात ठेवल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.