Ashish Deshmukh, K.C. Venugopal and Nana Patole. Sarkarnama
विदर्भ

Congress : के.सी. वेणुगोपाल हे पटोलेंच्या खिशात, डाॅ.आशिष देशमुखांचा खळबळजनक आरोप !

Nana Patole : नाना पटोलेंना नक्कीच बदलण्यात येणार नाही. त्यासाठीच हा फार्स करण्यात आलेला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ashish Deshmukh News : महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले यांना हटविण्याचा निर्णय तर झालाच नाही, मात्र कॉंग्रेसच्या अंतर्गत वादासंदर्भात अवलोकन करण्यासाठी आणि अहवाल पाठविण्यासाठी रमेश चेन्निथाला यांची एक-सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय झालेला आहे. के. सी. वेणुगोपाल यांनी त्यासंबंधी एक पत्र काढले आहे. त्यावर कॉंग्रेस नेते आणि माजी आमदार डॉ. आशिष देशमुख भडकले आहेत.

विधान परिषदेच्या नाशिक मतदार संघात कॉंग्रेस पक्षात जे काही घडलं, त्यानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी केली होती. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या पार्लीयामेंटरी बोर्डाचे सदस्य डॉ. आशिष देशमुख यांनीसुद्धा ही मागणी केली होती. सोबतच महाराष्ट्र कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले यांना हटविण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेसचे विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही केली होती.

बाळासाहेब थोरात यांनी आपला विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा देखील दिलेला आहे. तो ते वापस घेणार नाहीत. मी गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण जाणतो. माझे असे मत आहे की, ही जी रमेश चेन्निथाला यांची एक-सदस्यीय समिती बनविली आहे, ही संपूर्णत: फार्स आहे. के.सी. वेणुगोपाल हे नाना पटोलेंच्या खिशात आहेत. नाना पटोलेंचे धागेदोरे हे संपूर्ण हायकमांडच्या वर्तुळात आहेत, त्यामुळे नाना पटोलेंना नक्कीच बदलण्यात येणार नाही. त्यासाठीच या कमेटीचा फार्स नेमण्यात आलेला आहे, असे डॉ. देशमुख म्हणाले.

१७ जानेवारीला मी मल्लिकार्जुन खर्गे साहेबांना भेटून महाराष्ट्रातील कॉंग्रेसची सद्य बिकट परिस्थिती सांगितली आणि तेव्हा तशा आशयाचे पत्रदेखील त्यांना दिले. आमच्यासारख्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा वार्तालाप हा खर्गे साहेबांशी मराठीतच होत असल्यामुळे ते पत्र मी मराठीत लिहिले होते. पण त्यांनी मला ते पत्र इंग्रजीमध्ये द्यायला सांगितले. आपल्याला मराठी चांगले समजते, तेव्हा इंग्रजीमध्ये का..? असे मी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, अशा प्रकारची पत्रे मला वेणुगोपाल यांना रेफर करावी लागतात.

आजच्या घटकेला जे निर्णय कॉंग्रेसमध्ये राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर होत आहेत, ते के.सी. वेणुगोपालांसारख्या अपरिपक्व नेतृत्वाच्या माध्यमातून होत आहेत. ऑर्गनायझिंग सेक्रेटरी हे अतिशय जबाबदारीचे पद आहे. अशोक गहलोत यांच्यासारखे, जे आज राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यासारख्या प्रगल्भ आणि प्रदीर्घ अनुभव असलेल्या लोकांनी या पदावर आपलं कार्य सिद्ध करून दाखवलं आहे. आज जी परिस्थिती देशात आहे, ती के.सी. वेणुगोपाल यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वामुळे होत असल्याचा घणाघातही आशिष देशमुख यांनी केला.

जे काँग्रेसचे (Congress) दिल्लीतील सूत्र आहेत, तिथले प्रगल्भ अनुभव असणारे जे नेते आहेत, त्यांच्या निरीक्षणातून हेच दिसतं की नाना पटोलेंना (Nana Patole) बदलवण्यात येणार नाही. के.सी. वेणुगोपाल हे नाना पटोलेंच्या सोबत आहेत आणि म्हणूनच एक-सदस्यीय समिती श्री. रमेश चेन्निथाला यांची नेमणूक केली आहे. आणि त्यातून नाना पटोले यांची उचलबांगडी होईल, असे वाटत नाही. ह्याच पद्धतीनं जर सगळं चालत राहीलं तर नक्कीच बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) सारख्या लोकांना देखील काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल, असेही डॉ. आशिष देशमुख म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT