Yavatmal District Bank  Sarkarnama
विदर्भ

Yavatmal District Bank : यवतमाळ जिल्हा बँकेत सत्ता टिकविण्याचे काँग्रेससमोर आव्हान; अध्यक्षपदासाठी गेल्या पंचवार्षिकची पुनरावृत्ती होणार?

सरकारनामा ब्यूरो

Yavatmal News : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरुन जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. बँकेच्या अध्यक्षपदाचा प्रा. टिकाराम कोंगरे यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्षपदाबाबत गेल्या पंचवार्षिकमध्ये भाजपने केलेल्या खेळीची चर्चा रंगली आहे. जिल्हा बॅंकेत पुन्हा अशाच काही अनपेक्षित घडामोडी घडणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मागील पंचवार्षिकच्या निवडणुकीमध्ये भाजपचे एकमेव संचालक असलले अमन गावंडे यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. त्याची पुनरावृत्ती होऊन भाजप किंवा अपक्ष संचालकाची वर्णी लागणार काय? अशी चर्चा आहे. बँकेत काँग्रेसचे (Congress) ९, शिवसेना (शिंदे गट) तीन, शिवसेना (ठाकरे गट ) २, भारतीय जनता पक्षाचे २, अपक्ष एक, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजितदादा गट) २ राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) २ संचालक आहेत. काँग्रेसतर्फे नवीन अध्यक्षपदाच्या निवडीत विद्यमान उपाध्यक्ष व प्रभारी अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, मनीष पाटील, राजूदास जाधव हे संचालक इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, पक्षाच्या संचालकाकडूनच त्यांना विरोध असल्याचीही चर्चा आहे. कॉंग्रेस पक्ष कोणाचे नाव जाहीर करणार याकडे लक्ष आहे. मात्र, राज्यात सत्तेत असलेले भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजितदादा गट संयुक्तपणे बँकेत आपला अध्यक्ष नियुक्त करण्यासाठी प्रयत्न करू शकतात. तीन्ही गटांची सदस्य संख्या सात होत आहे. मात्र, सत्तेच्या बळावर ते बाजी मारू शकतात, असे बोलले जात आहे.

बँकेत कॉंग्रेस आघाडीचे बहुमत असले तरी गेल्या निवडणुकी प्रमाणे काही चमत्कार होऊन भाजप किंवा अजितदादा गटाचे संचालक बाजी मारण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस कोणता उमेदवार देणार याकडेच खऱ्या अर्थाने लक्ष असणार आहे. कॉंग्रेस नेते शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे बँक कॉंग्रेसच्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नांची शर्त करतील. खासदार (कै.) बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर जिल्हा बँकेतील पक्षाची सत्ता गेल्यास आगामी निवडणुकीवरही त्याचे परिणाम होणार आहेत. यामुळे काँग्रेस सतर्क राहणार आहे. तर भाजप, अजितदादा गट आणि शिंदेगटही वर्चस्वाची संधी सोडणार नाही.

प्रा. कोंगरेच्या राजीनामासाठी अनेक घडामोडी

बँकेच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, यासाठी महिनाभरापासून घडामोडी सुरु होत्या. त्यावर कोंगरेंच्या राजीनाम्यामुळे मंगळवारी पडदा पडला. अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने प्रभारी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर यांच्याकडे प्रभार देण्यात आला आहे. कोंगरे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी काँग्रेसमधील एक गट आग्रही होता. त्यासाठी शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनानंतर राजीनामा मोहीमेला वेग आला होता. राजीनामा न देण्यावर कोंगरे ठाम होते. त्यांनी यासाठी नाना पटोले यांची भेटही घेतली होती. पटोले यांनी राजीनामा न देण्याची सूचना केली होती. कोंगरे यांनी दिल्लीत जावून नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती आहे. मात्र, दिल्ली दौर्‍यातून त्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागले.

कोंगरे राजीनामा देणार नसल्याने अविश्‍वास प्रस्तावाची तयारीही सुरू झाली होती. दारव्हा मार्गावरील एका खासगी हॉटेलात नेते तसेच संचालकांची यासाठी बैठक झाली होती. या बैठकीमध्ये २१ पैकी जवळजवळ १५ संचालकांनी अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षर्‍या केल्याची माहिती आहे. अविश्वास दाखल होण्यापूर्वीच कोंगरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिली. राजीनामा मंजुरीसाठी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT