Nagpur News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. शंभरावे वर्षे सर्वांच्या स्मरणात राहावे,यासाठी यंदाचा विजयादशमी सोहळाही तेवढाच थाटात साजरा केला जाणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे आणि याचे साक्षीदार व्हावे याकरिता फक्त भाजपच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना संघाकडून (RSS) आमंत्रित केले जात आहे.
नागपूर शहरातील काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे आणि उत्तर नागपूरचे आमदार व माजी मंत्री नितीन राऊत यांनाही संघाच्यावतीने त्यांच्या घरी जाऊन निमंत्रण देण्यात आले. राऊत यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारले. मात्र आमच्या आणि तुमच्या विचारधारेमुळे उपस्थित राहता येणार नाही असे सांगून त्यांनी नम्रपणे आपला नकार कळविला.
दरवर्षी स्थापना दिनानिमित्त संघाच्यावतीने रेशीमबाग मैदानावर विजयादशमी सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावले जाते. सरसंघचालक या सोहळ्याच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करतात. काही संदेशही देतात. संघाची पुढील वाटचाल आणि दिशाही सांगितली जाते. त्यामुळे देशभरातील स्वयंसेवकांचे सरसंघाचालकांच्या भाषणाकडे लक्ष लागले असते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत बांधिलकी असलेले मोठमोठे नेते आणि प्रतिष्ठित व्यक्तीही या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावतात. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाच्या गणवेशात उपस्थित असतात.
विजयादशमी सोहळ्याच्या निमंत्रणाची जबाबदारी प्रत्येक प्रभागातील स्वयंसेवकांवर सोपविली जाते. त्यांच्या मार्फत त्या त्या भागातील प्रतिष्ठितांना निमंत्रित केले जाते. मात्र यंदाचा शताब्दी सोहळा असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना निमंत्रण देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांना विजयादशमीचे सोहळ्याला येण्याचे निमंत्रण देण्यात आले.
त्यांच्यासोबत माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनाही संघाचे प्रमुख अधिकाऱ्यांनी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. राऊत यांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले.
नितीन राऊत (Nitin Raut) यांनी संघाच्या शताब्दी सोहळ्याला शुभेच्छाही दिल्या. मात्र, काँग्रेसची विचारधारा वेगळी असल्याने या सोहळ्याला उपस्थित राहता येणार नाही, असे सांगून त्यांनी नम्रपणे आपला नकार कळवला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सतीश चुतर्वेदी, नागपूरचे माजी खासदार व केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार यांनाही संघाच्यावतीने निमंत्रित करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.