Sulbha Khodks unil Deshmukh  sarkarnama
विदर्भ

Sulbha Khodke : क्रॉस व्होटिंगने उमेदवार बदलणार! सुलभा खोडके विरुद्ध सुनील देशमुख थेट सामना

Rajesh Charpe

Sulbha Khodke News : विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांच्या यादीत अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचे नाव आहे. त्यामुळे खोडके यांचे विधानसभेला तिकीट कापले जाणार आहे. या कारवाईने जिल्ह्यात पुन्हा मोठा उलटफेर होणार आहे.

खोडके आपल्या मूळ राष्ट्रवादीत (अजित पवार गट) परत जातील तर माजी मंत्री सुनील देशमुखांचा काँग्रेसमधून लढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या दोन काँग्रेसच्या भांडणात मात्र भाजपला या मतदारसंघावरचा दावा सोडावा लागण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या पाच आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना घेतला आहे. या सर्वांना पुन्हा उमेदवारी द्यायची नाही, असे ठरवण्यात आले आहे. यात आमदार सुलभा खोडके यांचाही समावेश होता.

खोडके या मूळचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. आघाडी असताना अमरावतीची जागा सोडण्यास काँग्रेसने नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी नाईलाजाने पंजा हातात धरला होता. माजी मंत्री सुनील देशमुख यांचा त्यांनी पराभव केला होता.

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील पुत्र रावसाहेब शेखावत यांच्या राजकारणाला कंटाळून देशमुखांनी बंडखोरी केली होती. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आपल्या पुत्रासाठी अमरावतीची जागा मागितली होती. देशमुख हे तेव्हा आमदार होते.

विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री होते. मात्र राष्ट्रपतींनी आग्रह धरल्याने सर्वच काँग्रेस नेत्यांचा नाईलाज झाला होता. देशमुखांनी बंडखोरी मात्र ते पराभूत झाले. त्यानंतर देशमुखांनी भाजपची वाट धरली. अमरावतीमधून निवडून आले. मात्र जडणघडण काँग्रेसमध्ये झाल्याने देशमुखांचे भाजप नेत्यांसोबत कधीच पटले नाही.

सुलभा खोडके यांनी पराभूत केल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसवासी झाले. आता खोडके यांच्या काँग्रेस व्होटिंगने त्यांचा विधानसभा निवडणूक लढण्याच्या मार्गातील मोठा अडथळा दूर होणार आहे.

भाजप दावा सोडणार?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार प्रवीण पोटे मंत्री होते. अमरावीत जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्याकडे अमरावतीचे संभाव्य दावेदार म्हणून बघितल्या जाते. मात्र महायुतीमध्ये अजित पवार यांचा अमरावतीच्या जागेवर दावा राहणार आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करून खोडके यांनी महायुतीला मदत केली आहे. त्यामुळे भाजपही अजित पवार यांना विरोध करणार नाही असे दिसते. हे बघता पुन्हा खोडके विरुद्ध देशमुख असा सामना अमरावतीमध्ये रंगणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT