Chandrapur Congress Sarkarnama
विदर्भ

Congress News : ओबीसी ग्रामीण जिल्हयाध्यक्षांचा दोन महिन्यांत 'गेम', काँग्रेसची वज्रमुठ सुटतेय?

OBC Congress : कॉंग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश कार्यकारणीत सामावून घेतले जाणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Chandrapur District Congress News : चिमूर विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढण्याची जोरदार तयारी करणारे आणि जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांचा 'आर्थिक' आधार असलेले चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस ओबीसीचे (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष दिवाकर निकुरे यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला. दोन महिन्यांपूर्वीच त्यांना जिल्हाध्यक्ष पद मिळाले होते. त्यांना आता कॉंग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश कार्यकारणीत सामावून घेतले जाणार आहे.

पक्षातंर्गत विरोधकांमुळे त्यांचे पद गेले. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेसची 'वज्रमुठ' अंतर्गत मतभेदामुळे लकवाग्रस्त झाली आहे, हे पुन्हा समोर आले. चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी आहे. खासदार बाळू धानोरकर आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यातील 'सख्य' जगजाहीर आहे. राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे नेमके कुणाच्या बाजुने आहेत, हे कोडं कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अद्यापही सुटले नाही. वरोऱ्यांच्या आमदार प्रतिभा धानोरकर खासदारांच्या शब्दाबाहेर नाही.

दोन्ही गटांत काही पदाधिकारी फक्त विरोधकांच्या तक्रारी करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय विद्यमान आमदार आणि खासदारांव्यतिरिक्त आणखी काही चेहरे आपले अस्तित्व दाखविण्यासाठी धडपडत असतात. यात चिमूरचे वारजुकर बंधू यांचे नाव आर्वजुन घ्यावे लागले. माजी आमदार अविनाश वारजुरकर यांचे बंधू सतीश वारजुकर चिमूर विधासनभा निवडणुकीत एकदा पराभूत झाले होते. वारजुकर आणि वडेट्टीवारांतील 'स्नेहबंध' एवढे जबरदस्त आहे की ते दोघेही समोरासमोर येण्याचे टाळतात.

वारजुकरांना सध्या खासदार धानोरकरांचा आधार आहे. सतीश वारजुकर तिसऱ्यांदा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. वारजुकर विरोधकांनी दिवाकर निकुरे यांना हवा भरली. आमदारकीची उमेदवारी तुम्हालाच असे आश्वासन दिले. जिल्हा कॉंग्रेस ओबीसी विभाग (ग्रामीण)चे जिल्हाध्यक्ष पद दिले. वडेट्टीवारांचे वजन निकुरे यांच्या कामी आले. निकुरे यांचे जमीन खरेदी-विक्रीचे काम आहे. आर्थिक दृष्ट्या ते सक्षम आहेत. आमदारकीचे आश्वासन मिळाल्याने निकुरे यांनी अपेक्षेप्रमाणे 'मुद्रास्त्र' बाहेर काढले. त्यामुळे जुने -नवे कार्यकर्ते त्यांच्या भोवती एकवटायला लागले.

इकडे वारजुकर बंधू प्रचंड अस्वस्थ झाले. निकुरेंना पद मिळविण्यासाठी मदत करणाऱ्यांचे सुद्धा 'अच्छे दिन' आले. कधी नव्हे ते निकुरे यांच्या मदतीने वाढदिवसानिमित्त जिल्ह्याभरात शुभेच्छा फलकांचा 'प्रकाश' पडला. दुसरीकडे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्याकडे निकुरे यांच्या विरोधातील तक्रारींचा पाऊस पाडला. शेवटी निकुरे यांना पदावरून हटविण्याचे निश्चित झाले. परंतु त्यांना आमदारकीचे आश्वासन देणारे पुन्हा धावून आले.

आता निकुरे यांना कॉंग्रेस ओबीसी प्रदेश कार्यकारणीत स्थान दिले जाईल. प्रदेशाध्यक्ष माळी यांनी अनेकांचे पंख कापले आहे. जिल्हास्तरावरील अनेक पदाधिकारी निष्क्रीय आहेत म्हणून त्यांची उचलबांगडी केली. दुसरीकडे याच पदाधिकाऱ्यांना माळी प्रदेश कार्यकारणीत सामावून घेतात, असा आरोप निकुरे समर्थकांचा आहे. निकुरे यांनी उद्या गुरूवारी चिमुर येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले येणार आहेत. मात्र तत्पूर्वी पक्षातंर्गत विरोधकांनी त्यांचा 'गेम' केला.

प्रशांत दानव जिल्हाध्यक्षपदी..

चंद्रपूर (Chandrapur) शहर महानगर पालिकेत (Municipal Corporation) सलग चारदा प्रतिनिधित्व करणारे प्रशांत दानव यांची चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस ओबीसी (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली. दानव चंद्रपूर शहरात वास्तव्याला आहेत. चंद्रपूर शहरचे ओबीसी (OBC) जिल्हाध्यक्ष विशाल दोगुलवारसुद्धा याच शहरात राहतात. आता ओबीसीचे ग्रामीण आणि शहराचे जिल्हाध्यक्ष एकाच गावातील असतील.

निकुरे यांच्यामुळे वारजुकर बंधू प्रचंड अस्वस्थ होते. शेवटी खासदार धानोरकरांनी (Balu Dhanorkar) आपले वजन वापरले त्यानंतर दानव यांना पद मिळाले, अशी चर्चा आहे. धानोरकर आणि वडेट्टीवारांच्या या शीतयुद्धात धानोरकर तुर्तास वरचढ ठरले. मात्र आगामी काळात जिल्हा कॉंग्रेस कमेटी आणि वेगवेगळ्या सेलच्या नियुक्त्यांवरुन या दोघांमध्ये चांगलाच धुराळा उडणार आहे, हे निश्‍चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT