Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole News : अंबानगरीत फूटपट्टी लावत नाना पटोले घेणार पश्चिम विदर्भाचा आढावा !

Congress News : अमरावती येथे होणाऱ्या या बैठकीत विचारमंथन होणार आहे.

अतुल मेहेरे

Vidarbha News : पश्चिम विदर्भात काँग्रेसचा 'पंजा' अधिक बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) अगदी फूटपट्टी लावून पक्षाच्या पाचही जिल्ह्यांतील वाटचालीचा आढावा घेणार आहेत. यासाठी 11 ऑक्टोबरचा मुहूर्त ठरविण्यात आला आहे. हैदराबाद आणि उदयपूर येथे काँग्रेसचे शिबिर नुकतेच झाले. त्यात ठरल्यानुसार पक्षाची वाटचाल काय असेल, यावर अमरावती येथे होणाऱ्या या बैठकीत विचारमंथन होणार आहे.

अंबानगरीत होणाऱ्या या बैठकीला तेलंगण राज्याचे काँग्रेस प्रभारी तथा महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कृणाल पाटील, आमदार अॅड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), प्रा. वसंत पुरके, डॉ. सुनील देशमुख, महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या सव्वालाखे हेदेखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांची ही बैठक असल्याने जबाबदाऱ्यांचे जिल्हानिहाय वाटप करण्यात आले आहे.

अमरावती शहराची जबाबदारी प्रदेश महासचिव प्रशांत गावंडे यांच्याकडे देण्यात आली आहे. अमरावती ग्रामीणचे काम प्रदेश महासचिव प्रकाश तायडे पाहणार आहेत. प्रदेश महासचिव किशोर बोरकर यांच्याकडे बुलडाणा (Buldhana) जिल्ह्याची जबाबदारी असेल. प्रदेश सचिव जावेद अन्सारी वाशीम जिल्ह्याची धुरा सांभाळतील. प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे यवतमाळची तर प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले अकोला शहराचे काम पाहणार आहेत. अकोला ग्रामीणची जबाबदारी प्रदेश सचिव दिलीप भोजराज यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

बुधवारी (ता.11) सकाळी दहापासून या मॅरेथॉन बैठकीला सुरुवात होणार आहेत. अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, अकोला शहर आणि अकोला ग्रामीण अशा क्रमाने प्रत्येक जिल्ह्यातील पक्षाच्या कामाचा आढावा व सद्य:स्थितीची माहिती नेतेमंडळी घेणार आहेत. बैठकीत मंडळ कमिटी, बूथनिहाय प्रमुख, ग्राम समिती, ब्लॉक कार्यकारिणीचाही आढावा घेण्यात येणार आहे. जिल्हा कार्यकारिणीचे कामकाज, संघटनात्मक रिक्त असलेली पदे याची माहितीही काँग्रेस नेते घेणार आहेत.

अमरावती येथे होणाऱ्या या बैठकीची माहिती काँग्रेसचे (Congress) नेते पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचविणार आहेत. आगामी काळातील निवडणूक बघता पश्चिम विदर्भाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. बैठकीदरम्यान आरोप-प्रत्यारोप होऊ नये, यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते आतापासूनच प्रयत्न करीत आहेत. बैठकीनंतर येत्या काळात जिल्हास्तरावरील जबाबदाऱ्यांमध्ये काही प्रमाणात बदलही होऊ शकतात, असे संकेतही पक्षाच्या सूत्रांनी दिले आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT