Dharmpal Meshram and Vilas Muttemwar Sarkarnama
विदर्भ

Congress VS BJP : माफी न मागितल्यास नागपुरातील भाजप नेता उचलणार काँग्रेसच्या `या’ ज्येष्ठ नेत्यावर हात !

Atul Mehere

Nagpur City Political News : पूर्व विदर्भातील सात जिल्ह्यांतील काँग्रेसच्या कामाचा आढावा घेण्यासाठी काल (ता. १२) नागपुरात पार पडलेल्या विभागीय बैठकीत काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर नागपुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. (The confusion in the divisional meeting of the Congress has reached a bad turn)

कॉंग्रेसच्या या नेत्याने आपल्या वक्तव्याबाबत माफी न मागितल्यास त्याच्यावर हात उचलण्याचा इशारा भाजपच्या एका नेत्याने दिला आहे. नागपुरातील महाकाळकर सभागृहात आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीत काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली.

प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले होते. बैठकीच्या ठिकाणाहून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप नागपूर भाजपने केला आहे.

मुत्तेमवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत तत्काळ क्षमा याचना करावी, अशी मागणी करीत, नागपूर भाजपने शुक्रवारी आक्रमक भूमिका घेतली. नागपूर भाजपचे नेते धर्मपाल मेश्राम यांनी तर या मुद्द्यावर अत्यंत टोकाची आक्रमक भूमिका घेत विधान केले आहे. काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी न मागितल्यास त्यांच्यावर प्रसंगी हात उचलू, असा इशारा धर्मपाल मेश्राम यांनी दिल्याने उपराजधानीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

धर्मपाल मेश्राम हे नागपूर महापालिकेच्या राजकारणामधील मोठे नाव आहे. महापालिकेतील सभापतिपदावरही मेश्राम कार्यरत होते. आपल्या संयमी वागणुकीसाठी ते ओळखले जातात. परंतु त्यांनीच विरोधी पक्षातील वयाने व अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या नेत्यावर हात उगारण्याची भाषा केल्याने उपराजधानीतील राजकीय वर्तुळात भाजप विरुद्ध काँग्रेस असा वाद रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजप नेते धर्मपाल मेश्राम यांच्या या इशाऱ्यावर अद्याप काँग्रेसने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र, काँग्रेसमधील मुत्तेमवार गटदेखील मेश्राम यांच्या या इशाऱ्यानंतर आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांना इशारा देणारा धर्मपाल मेश्राम यांचा व्हिडिओ शुक्रवारी (ता. १३) सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला.

...अन् गळ्यात येऊन पडले पाय

काँग्रेसच्या विभागीय बैठकीमध्ये व्यासपीठावरच नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आपापसात जुंपल्यामुळे पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी तशीच वाढली आहे. अशात वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झालेल्या विलास मुत्तेमवार यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल करत भाजपने दलित समाजाला काँग्रेस विरुद्ध भडकविण्याचा चांगलाच प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची परिस्थिती ‘करायला गेलो काय अन् गळ्यात येऊन पडले पाय’ अशी झाली आहे. आता या मुद्द्यावर भाजप काय भूमिका घेते आणि काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT