Nagpur Municipal Corporation Election
Nagpur Municipal Corporation Election Sarkarnama
विदर्भ

NMC : कॉंग्रेस कार्यकर्ते ‘भारत जोडो’त, तर राष्ट्रवादी ‘चिंतनात’ व्यस्त; शिवसेनेचे काय?

Atul Mehere

नागपूर : नागपूर (Nagpur) महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहेत. अशात भारतीय जनता पक्षाने तयारीचा वेग वाढवला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शहरात विविध उपक्रम, कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शहरात बैठकी आणि वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला आहे. याचा फायदा भाजपला महापालिका निवडणुकीत निश्‍चितपणे होणार आहे.

अशा परिस्थितीत कॉंग्रेसचे (Congress) नेते, कार्यकर्ते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) कार्यकर्ते चिंतन शिबिरात व्यस्त आहेत. भारत जोडो आणि चिंतन शिबिर संपल्यावर ते सक्रिय होतीलही. पण शिवसेनेचे (दोन्ही) काय, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. गत वेळी राष्ट्रवादीचा फक्त एक नगरसेवक तर शिवसेनेचे दोन नगरसेवक होते. आता तर शिवसेनाही दोन झाल्या आहेत. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) आणि बाळासाहेबांची शिवसेना (Eknath Shinde) दोन्ही थंड दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे काय, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर पुन्हा सत्तेत आल्याने भारतीय जनता पक्षाने मरगळ झटकून महानगरपालिका निवडणुकीसाठी जय्यत तयार सुरू केली. दुसरीकडे आघाडीत लढावे की एकत्र या संभ्रमात असल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अजूनही कोमातच असल्याचे दिसून येत आहे.

भाजप वर्षभर निवडणुकीच्या मिशनवरच असतो. महापालिकेची निवडणूक केव्हाही घोषित होणार असल्याने पक्षस्तरावर आणि इच्छुकांमार्फत वैयक्तिक स्तरावर व भेटीगाठींचा कार्यक्रम राबविला जात आहे. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या सामाजिक, सांस्कृतिक तसेच भव्यदिव्य उपक्रमांचा चांगलाच फायदा भाजपला होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही शहरात सक्रिय झाले आहेत. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी बैठका आणि भेटीगाठी, उद्‍घाटनांचा सपाटा लावला आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर असलेली नाराजी दूर करण्यात दोन्ही नेत्यांना बऱ्यापैकी यश आले आहे. महापालिका निवडणूक लांबल्याचा फायदाही भाजपला होणार असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.

महाविकास आघाडी सत्तेवर असताना महापालिकेतही सत्ताबदल होणार असे वाटत होते. तशी जनभावना तयार करण्यात यश येऊ लागले होते. त्यातच तीन सदस्यांच्या प्रभागाची रचनाही काँग्रेसला पोषक होती. काँग्रेसने केलेल्या गोपनीय सर्वेक्षणात किमान ६० नगरसेवक जिंकून येतील असे आढळून आले होते. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता. राज्यातील सत्ताबदलानंतर तो आता मावळत चालल्याचे दिसून येते.

काँग्रेसची एक निश्चित व्होट बँक शहरात आहे. भाजपलाही ते नाकारता येत नाही. महाविकास आघाडीमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. एकत्रित लढल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी किमान ५० जागा सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे फायद्यापेक्षा भांडणेच वाढणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला शहरात वाढू देणे काँग्रेससाठी धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांचा आघाडीला कडाडून विरोध आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत तर राष्ट्रवादी चिंतन बैठकीत व्यस्त आहे. शिवसेनेत नेमके काय सुरू आहे, हे कोणालाच ठाऊक नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT