Talathi Office in Chandrapur Google
विदर्भ

Administration : ‘भाऊंचे’प्रयत्न फळास आले, बावन्न गावांत तलाठी कार्यालय मंजूर झाले

Talathi Office : चंद्रपुरातील ग्रामस्थांचे काम होणार सोपं

संदीप रायपुरे - Sarkarnama

Development in Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्याच्या माथ्यावर लागलेला मागासलेपणाचा कलंक पुसण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नरत असलेल्या ‘भाऊंच्या’ आणखी एका परिश्रमाचे फलित झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी नव्याने ५२ तलाठी कार्यालय उभारण्यास राज्य सरकारनं मंजुरी प्रदान केलीय.

नव्यानं उभारल्या जाणाऱ्या या तलाठी कार्यालयांमुळं ग्रामीण जनता आणि शेतकऱ्यांची गैरसोय टळणार आहे. तलाठ्यांचा शेती व शेतकऱ्यांशी नियमित संबंध येतो. तलाठ्यांची अपुरी संख्या, एकाच तलाठ्याकडे अनेक गावांचा कारभार आणि तलाठी कार्यालयच नसणं, यामुळे चंद्रपुरातील ग्रामस्थांना तलाठ्याचा शोध घेत फिरावे लागत होते. त्यामुळं ग्रामस्थांची कामं खोळंबायची. यासंदर्भात विविध गावातील नागरीकांनी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाया मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत तलाठ्यांबाबत येणारी अडचण त्यांना सांगितली. (Talathi office approved by Sudhir Mungantiwar in Chandrapur district)

ग्रामस्थांची मागणी लक्षात घेत मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील तलाठ्यांबाबतची सर्वंकष माहिती संकलित करण्याचे आदेश दिलेत. त्याचा शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. चंद्रपूर जिल्ह्याची गरज लक्षात घेता राज्य सरकारने आता ५२ नवीन तलाठी कार्यालय उभारण्यास मान्यता प्रदान केली. या कार्यालयांच्या उभारणीसाठी १८ कोटी १९ लाख २४ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यताही देण्यात आलीय.

चंद्रपूर हा नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग. त्यामुळं गावातील नागरीकांना आवश्यक ते महत्वाचे दाखले, कृषी विषयक नोंदी, ईतर कागदपत्रं वेळेत मिळावे यासाठी नवीन तलाठी कार्यालयांची आवश्यकता होती. यासंदर्भात चंद्रपूर जिल्हा प्रशासनानं सुरवातीला ७ कोटी ८० लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. मात्र यात कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासह तलाठी कार्यालयाची निर्मिती करण्याची दुरूस्ती मुनगंटीवार प्रशासनाला सुचविली. त्यामुळे नव्यानं प्रस्ताव तयार करून घेत त्याला शासकीय मान्यता मिळाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शासनानं प्रदान केलेल्या मंजुरीनंतर आता पोंभुर्णा तालुक्यात ११, चंद्रपूर तालुक्यात ६, बल्लारपूर तालुक्यात ७ आणि मूल तालुक्यात २८ नवीन तलाठी कार्यालय उभारण्यात येणार आहेत. या तलाठी कार्यालयांमधुन २१ गाव नमुना तयार करणे, नमुन्यांचे अद्ययावतीकरण, वारसान नोंदी, खरेदी-विक्री व्यवहारानुसार सातबारावर फेरफार, नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानीचे पंचनामे, नुकसान भरपाईबाबत प्रक्रिया राबविणे, रहिवासी व उत्पनाचा दाखला आदी कामं होणार आहेत.

जिल्ह्यात मंजूर झालेल्या नवीन ५२ तलाठी कार्यालयांसाठी सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्न केले. आता असेच प्रयत्न ते जिल्ह्यातील ईतर तालुक्यांच्या बाबतीतही करणार आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणुन सर्वच तालुक्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील तलाठी कार्यालयांचा चेहरामोहरा बदलेला दिसेल अशी ग्वाही देखील त्यांनी यानिमित्तानं दिली.

(Edited by : Prasannaa Jakate)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT