MLA Indranil Naik Dacing with Sword. Sarkarnama
विदर्भ

Yavatmal : रईस चित्रपटातील पेहराव अन् तलवार घेत आमदार नाईकांचा ‘अलमिडो..’

Indranil Naik : सौभाग्यवतींचीही सुंदर साथ, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

सतीश हरिश्चंद्र येटरे

Dance With Sword : रईस चित्रपटात नायक शाहरुख खान यांनी केलेल्या पेहरावाशी साधर्म्य असलेली काळी पठाणी, गळ्यात मफलर परिधान करून आणि हातात धारदार तलवार घेत सपत्नीक एका पारंपरिक गीतावर थिरकणारे पुसद विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आमदार नाईक यांना या नृत्यावर त्यांच्या सौभाग्यवतींनी दिलेल्या साथीवरही नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे नाईक घराणे हे नेहमीच ‘ग्लॅमर’मध्ये असते. कृषी क्रांतीचे प्रणेते दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा राजकीय वारसा त्यांची कौटुंबिक पिढी आजही डौलाने सांभाळत आहे. त्यापैकीच एक पुसद विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेआमदार इंद्रनील नाईक आहेत. ते माजी मंत्री मनोहर नाईक यांचे सुपुत्र आहेत. राजकारण करीत असताना आमदार इंद्रनील नाईक हे विविध कौटुंबिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमातही मोठ्या हिरीरीने सहभागी होतात.

मोहिनी या देखील पती इंद्रनील यांच्या पाउलावर पाऊल ठेवत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आता सक्रिय झाल्या आहेत. अशाच एका कौटुंबिक कार्यक्रमात पारंपरिक गीतावर आमदार इंद्रनील नाईक यांनी ठेका धरला. ते पाहून त्यांच्या पत्नीलाही इंद्रनील यांच्यासोबत नृत्य करण्याचा मोह आवरला नाही. सध्या पुसद विधानसभा मतदारसंघात तरुण आमदार इंद्रनील यांची चांगलीच ‘क्रेझ’ आहे. इंद्रनील आणि त्यांच्या पत्नी मोहिनी यांना थिरकताना पाहून त्यांच्या चाहत्यांनी या डान्सचे व्हिडीओ चित्रीकरण केले. हा व्हिडीओ सोशल माध्यमांनवर व्हायरल केला.

रईस चित्रपटात नायक शाहरुख खान यांनी काळी पठाणी परिधान केली होती. त्याच पोशाखाशी साधर्म्य असलेला पोशाख आमदार इंद्रनील नाईक यांनी परिधान केला होता. साजेस संगीत आणि गीत यावर धमाल करणाऱ्या नाईक दाम्पत्याचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचे प्रचंड ‘व्ह्यू’ त्याला मिळाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाघो घोडो अलमिडो

आमदार इंद्रनील नाईक ज्या गाण्यावर थिरकत आहे, ते गीत राजस्थान आणि गुजरात राज्यात फार प्रसिद्ध आहे. ‘अलमिडो अलमिडो घोडो, की बाघो घोडो अलमिडो’ असे या गीताचे शब्द असून ते पारंपरिक गीत आहे. या गीताचा अर्थ अनेकांना समजत नसला तरी त्यातील शब्द आणि संगीत थिरकायला भाग पाडते. आमदार इंद्रनील आणि पत्नी मोहिनी यांच्याबाबतही असेच काहीसे झाले असावे.

विरोधकांकडून टीका

यवतमाळ पोलिस जिल्ह्यात कुणी हातात धारदार तलवार अथवा घातक शस्त्र घेऊन कौटुंबिक, वैयक्तिक, सार्वजनिक कार्यक्रमात हातात घातक शस्त्र घेऊन नाचल्यास किंवा जाहीर प्रदर्शन केल्यास त्याला हुडकून काढतात. त्याच्याविरोधात कारवाई केली जाते. ‘बर्थ डे’ पार्टीत तलवारीने केक कापणाऱ्या अनेकांवरही विदर्भात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र आमदार नाईक यांच्याबाबत ते घडले नाही. त्यामुळे विरोधक खासगीत बोलताना टीका करीत आहेत. पोलिसांच्या कारवाईकडे त्यांचे लक्ष्य लागले आहे. यासंदर्भात आमदार इंद्रनील नाईक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यांचे स्वीय सहाय्यकानेही आमदार संपर्क कक्षेबाहेर असल्याचे सांगितले.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT