Eknath Shinde, Uddhav Thackeray and Krupal Tumane
Eknath Shinde, Uddhav Thackeray and Krupal Tumane Sarkarnama
विदर्भ

परवाच 'मी कट्टर उद्धव ठाकरे समर्थक', म्हणणारे, कृपाल तुमानेही नॉट रिचेबल...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खासदारांची बैठक आज मातोश्रीवर बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे सर्व खासदार उपस्थित राहतील, असा विश्‍वास त्यांना होता. पण आजच्या बैठकीला १९ पैकी १० खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे खासदारही बंडाच्या पवित्र्यात असल्याची शंका व्यक्त होत आहे.

शिवसेनेच्या ४० आमदारांनी झटका दिल्यानंतर पक्षप्रमुख यांना एकावर एक हादरे बसत आहेत. त्यातच आता खासदारही बंडाच्या पवित्र्यात दिसत असल्याने सेनेसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. आजच्या बैठकीत गजानन र्कीतीकर, मुंबई नॉर्थ वेस्ट, अरविंद सावंत, (Arvind Sawant) मुंबई दक्षिण, विनायक राऊत, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, धैर्यशील माने, हातकणंगले, हेमंत गोडसे, नाशिक, राहुल शेवाले, दक्षिण मध्य मुंबई, श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवड, प्रताप जाधव, बुलडाणा, सदाशिव लोखंडे, शिर्डी आणी राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) हजर होत्या.

दांडी मारणाऱ्या खासदारांमध्ये यवतमाळ-वाशिमच्या भावना गवळी, पालघरचे राजेंद्र गावीत, परभणीचे हेमंत जाधव, कोल्हापूरचे संजय मांडलिक, हिंगोलीचे हेमंत पाटील, उस्मानाबादचे ओमराजे निंबाळकर, कल्याण-डोंबिवलीचे श्रीकांत शिंदे, रामटेकचे कृपाल तुमाने, ठाणेचे राजन विचारे, दादरा-नगर हवेलीच्या कलाबेन डेलकर यांचा समावेश आहे. आमदारांपाठोपाठ काही खासदारही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राज्यात रंगली आहे, त्यामुळे या खासदारांच्या अनुपस्थितीमुळे ते नाराज असल्याचा अर्थ काढण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या नाराज १० खासदारांची बैठक झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, याबाबत परवा शनिवारी त्यांना विचारणा केली असता, तुमाने यांनी त्याचा इन्कार केला होता. ‘मी कट्टर उद्धव समर्थक’, असे उत्तर त्यांनी दिले होते. मात्र, तेच तुमाने आजच्या मातोश्रीवरील बैठकीला गैरहजर राहिल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. मंगळवारी आपण पार्लीमेंट्री बोर्डाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहो, असे त्यांनी सांगितले होते. आज पक्षाच्या बैठकीला दांडी मारून एकनाथ शिंदे गटाच्या मार्गावर असल्याचे खासदार तुमानेंनी दाखवून दिले असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते ‘नॉट रिचेबल’ होते.

शनिवारी खासदार तुमानेंशी संपर्क केला असता, आमचे खासदार दिल्लीत आहेत आणि माझ्या दिल्लीतील घरी त्यांची काल बैठक झाल्याचे वृत्त देण्यात आले. पण अशी कुठलीही बैठक झाली नाही आणि काल मी नागपुरात होतो, असे खासदार तुमानेंनी सांगितले होते. माझ्या माहितीप्रमाणे आमचे पाच ते सहा खासदार पंढरपूरला गेलेले आहेत. मग दिल्लीत पोहोचले कसे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला होता. शिवसेनेच्या खासदारांमध्ये कुठलीही चलबिचल नाही. खासदार भावना गवळींना प्रतोदपदावरून हटवण्यात आले, त्याचे कारण आमचे पक्षश्रेष्ठीच सांगू शकतात. त्यांच्याबद्दल मी बोलणे योग्य होणार नाही. यासंदर्भात खासदार भावना गवळी यांच्याशी मी बोललो. त्या स्वतःच माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडणार आहेत, असे त्यांनी शनिवारी ‘सरकारनामा’शी बोलताना नमूद केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT