Devendra Fadanvis and Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यावेळी रिस्पॉन्स टाइम चांगला राहिला...

वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा दौरा करून आल्यानंतर येथील विभागीय कार्यालयात फडणवीसांनी (Devendra Fadanvis) आढावा बैठक घेतली.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यायची झाल्यास संपूर्ण राज्यात पावसाने नुकसान झाले आहे. त्याचा निर्णय राज्यासाठी घेण्यात येईल. नागपूर विमानतळाच्या (Nagpur Airport) कामासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आत्ताच आलेला आहे. त्या निर्णयाचा आम्ही अभ्यास करतो आहे. त्या आधारावर पुढची कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज सांगितले.

वर्धा (Wardha) आणि चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा दौरा करून आल्यानंतर येथील विभागीय कार्यालयात फडणवीसांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) होते. ते म्हणाले, नागपूर विभागात जी अतिवृष्टी झाली, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहणी करायला गेलो होतो. वर्धेत हिंगणघाट आणि चंद्रपूरमध्ये चिमूर तालुक्यात मोठा पूर आला. जून आणि जुलै महिन्याची पावसाची जी सरासरी असते, त्याच्या १२० ते १९० टक्क्यांपर्यंत हा पाऊस झाला आहे. त्यातही हा पाऊस जुलै महिन्यात पडला, तर जून महिन्यास सरासरीच्या ६० टक्केच पाऊस पडला. कमी दिवसांत जास्त पाऊस पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. साधारणपणे शेतीचा विचार केला तर १ लाख ३५ हजार हेक्टरवर नुकसान झालेले आहे.

काही ठिकाणी तर दुबार पेरणी करूनही वाया गेली आहे. जे काही नुकसान झाले, त्यापैकी ३५ ते ४० टक्के ठिकाणीच पुन्हा पेरणी करणे शक्य होणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उर्वरित शेतीसाठी वेगळा विचार करावा लागणार आहे. जेथे दुबार पेरणी शक्य आहे, त्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन केलेले आहे. कापूस, मका, तूर आणि धान हे बियाणे दुबार पेरणी करिता उपलब्ध करून दिले आहेत, खतेही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ४५० च्या आसपास पशुधनाचेही नुकसान झालेले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

तातडीची खावटीची मदत देण्याचे काम सुरू केले आहे. मागील नुकसानाचे पैसेही अद्याप संबंधितांना मिळालेले नाहीत. पण आता पंचनामे झालेल्या नुकसानाचे पैसे शेतकऱ्यांना लवकर कसे मिळतील, याचा प्रयत्न करणार आहोत. काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्यासाठी तात्काळ करायची कामे आणि दीर्घकालीन करायची कामे, याचाही अभ्यास केला जात आहे. सप्टेंबर महिन्यातही अतिवृष्टी होते, असा इतिहास आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये निसर्गाची सायकल बदललेली असल्याचे फडणवीस म्हणाले.

आत्तापर्यंतचा रिस्पॉन्स टाइम आपला चांगला राहिलेला आहे. कारण अनेकांचे मृत्यू आपण वाचवू शकलो आहोत. एसडीआरएफ, एनडीआरएफच्या टीम वेळेवर पोहोचल्या आणि रेस्क्यू ऑपरेशन योग्य रित्या पार पाडले. यावेळी धरणांचेही मॉनिटरींगही योग्य प्रकारे सुर आहे. त्यामुळे किती पाणी सोडल्यावर किती वेळात ते कुठे पोहोचेल. याचे नियोजनही केले जात आहे. ढगफुटीचा विचार करून टीम काम करते आहे. रिस्पॉन्स टाइम कसा कमी करता येईल, याचा विचार करत आहो. सर्वात जास्त पाणी गडचिरोलीकडे वाहून जात आहे. तेथून तेलंगणामध्ये हा प्रवाह गेला आहे. त्यातल्या त्यात सिरोंचाची स्थिती सध्या वाईट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी स्वतः जेव्हा गडचिरोलीचा दौरा केला, तेव्हा गडचिरोली जिल्ह्याच्या समस्या कायमस्वरूपी मिटवण्यासाठी सूचना दिल्या असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT