Anil Deshmukh
Anil Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Anil Deshmukh : देशमुखांची दिवाळी जाणार तुरुंगात, खिन्न होऊन परतले कार्यकर्ते...

Atul Mehere

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार अनिल देशमुख यांची ही दिवाळी तुरुंगातच जाणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. आजही देशमुखांना दिलासा मिळाला नाही. त्यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे.

मनी लॉंड्रींग प्रकरणी अनिल देशमुख (Anil Deshmukh) गेल्या वर्षभरापासून तुरुंगात आहेत. अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप आहेत आणि सीबीआयकडे (CBI) त्यांच्या विरोधात ठोस पुरावे आहेत. त्यामुळे त्यांना जामीन देता येणार नाही, असे निरीक्षण विशेष सीबीआय न्यायालयाने नोंदवले आहे. देशमुख गृहमंत्री (Home Minister) असताना पैशांचे गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात झाले. त्याचेही पुरावे सीबीआयकडे आहेत. त्यामुळे त्या पुराव्यांच्या आधारावरच विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असल्याचे सांगण्यात आले आहे. सद्यःस्थितीत त्यांच्यावर मुंबईतील (Mumbai) जसलोक या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. न्यायालयाच्या आजच्या निर्देशाच्या विरोधात त्यांचे वकील मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आहे.

अनिल देशमुख यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारचे आरोप आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यामार्फत महिन्याला १०० कोटी रूपये खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणात गुन्हा दाखल करून, सीबीआय चौकशी झाली. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.

ईडीच्या आरोपानुसार, साहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेने बार चालू ठेवण्यासाठी मुंबईतील बारमालकांकडून ४.७ कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम देशमुख यांचे स्वीय साहाय्यक संजीव पालांडे यांच्याकडे सुपूर्द केली. तपासात असे समोर आले आहे की, हवाला चॅनलद्वारे पैसे दिल्लीमधील सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते, या दोघांवर बनावट कंपन्या चालवण्याचा आरोप आहे. जैन बांधवांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप आहे.

कार्यकर्त्यांत निराशा..

आज दुपारी अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. त्यामुळे त्यांचे समर्थक, कार्यकर्ते नागपुरातील सिव्हिल लाइन्स येथील त्यांच्या निवासस्थानी एकत्र आले होते. आज सीबीआयच्या प्रकरणात आज त्यांना जामीन मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांना होती. पण न्यायालयाचा निकाल आल्यानंतर त्यांच्यामध्ये निराशा पसरली. उत्साहात एकत्र झालेले कार्यकर्ते खिन्न मनाने परतले. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्‍वास आहे. साहेबांना लवकरच न्याय मिळेल, अशा आशावाद कार्यकर्त्यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT