Maarashtra Assembly Winter Session News : कर्नाटक सिमेवरील मराठी बांधवांना महाराष्ट्र सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही देत कर्नाटकविरोधात इंच इंच जागेसाठी लढा देऊ, असे आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanis) यांनी सांगितले. मुख्यमंत्री दिल्लीला गेल्याने कर्नाटकविरोधात ठराव उद्या, मंगळवारी घेण्यात येईल, असे स्पष्ट करीत त्यांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्नाटकच्या (Karnataka) विरोधात ठराव आज घेण्याबाबत चर्चा झाली होती. हा ठराव आला नसल्याने नाराजी व्यक्त करीत चर्चेची मागणी केली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून जाणीवपूर्वक वादग्रस्त विधाने करीत महाराष्ट्राला (Maharashtra) डिवचले जात आहे. परंतु महाराष्ट्र सरकार गप्प बसले असल्याचा आरोपही पवार यांनी केला. त्यांनी जशास जसे उत्तर देण्याची मागणी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी बघ्याची भूमिका न घेता कर्नाटक सरकारला गंभीर इशारा देण्याची मागणी केली. कर्नाटकमध्ये निवडणूक आहे. त्यामुळे तेथील मुख्यमंत्री जाणीवपूर्वक भडक व्यक्तव्य करीत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली. यावर फडणवीस यांनी या मुद्दयावर सभागृहाचे एकमत असून मुख्यमंत्री आज दिल्लीला गेल्याने उद्या याबाबत ठराव घेणार असल्याचे सांगितले.
फडणवीस यांनी उद्या ठराव घेणार असल्याचे सांगताच सेनेचे सदस्य आक्रमक झाले. भास्कर जाधव यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री वाट्टेल ते ठराव करीत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मान खाली घालुन बसल्याचा आरोप केला. यावर फडणवीस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावेल, अशी कुणाच्या बापाची हिंमत नाही, असे सांगितले.
विरोधकांचा सभात्याग..
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांना कामकाजात सहभागी करून त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याची विनंती केली. मुख्यमंत्री उपस्थित नसल्याने, ते आल्यानंतर यावर निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले. यावर विरोधकांनी सभात्याग केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.