Devendra Fadnavis News Sarkarnama
विदर्भ

BJP Politics : भाजपचा मोठा निर्णय! देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातील कार्यकारिणी बरखास्त

Devendra Fadnavis News : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मोठी यंत्रणा उभारली होती. यात 370 बुथ प्रमुख, 105 शक्ती प्रमुख, वॉरियर आणि वॉरियरच्यावर सूपर वॉरिअर अशी नेमणूक केली होती.

Rajesh Charpe

BJP Political News : विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाची कार्यकारिणी भाजपने बरखास्त केली आहे. यामुळे कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.

लोकसभा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना मोठी आघाडी मिळवता आली नाही. विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी 49 हजारांचे मताधिक्य घेतले होते. लोकसभेत तेसुद्धा भाजपला टिकवता आले नाही. याचे खापर कार्यकारिणीवर फोडण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मोठी यंत्रणा उभारली होती. यात 370 बुथ प्रमुख, 105 शक्ती प्रमुख, वॉरियर आणि वॉरियरच्यावर सूपर वॉरिअर अशी नेमणूक केली होती.

यापूर्वी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचीसुद्धा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात 54 टक्केच मतदान झाले.

याच यंत्रणेच्या माध्यमातून मतदार याद्यांच्या वाचनाचा कार्यक्रम मतदानापूर्वी भाजपने राबवला होता. मतदानाच्या दिवशी मात्र हजारो मतदारांची नावे यादीतून गहाळ असल्याचे समोर आले. सोबतच मतदार यादीत अनेकांच्या नावासमोर ‘डिलिटेड' असा शिक्का मारला होता. त्यामुळे हजारो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले.

मतदानाच्या दिवसापर्यंत बुथ प्रमुखापासून पन्नाप्रमुखांपर्यंत कोणाच्याही ही बाब लक्षात आली नव्हती. त्यावरून थातूरमातूर कामे केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस सलग तीन वेळा जिंकले आहेत.

मुख्यमंत्री असताना पश्चिम नागपूरमध्ये सर्वाधिक विकास निधी देण्यात आला होता. दोन महापौरसुद्धा याच मतदारसंघातून देण्यात आले होते. एवढे सारे केल्यानंतरही भाजपचे मताधिक्य घटत चालले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

देवेंद्र फडणवीस पुन्हा येथून निवडणूक लढणार आहेत. लोकसभेत घटलेले मताधिक्य बघून काँग्रेसचा उत्साह वाढला आहे. फडणवीस यांच्या विरोधात यापूर्वी लढलेले ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे पुन्हा एकदा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांनी मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. महाविकास आघाडी आणि लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत भांडणे, मतभेद आता संपल्याचे दिसत आहे.

विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत लोकसभेमध्ये असलेली राजकीय परिस्थिती कायम राहिल्यास देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा निवडणूक जिंकणे यापूर्वीच्या तुलनेत सोपे नाही अशी चर्चा आहे. हे बघून जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून नव्या दमाची कार्यकारिणी तयार केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT