Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे विचार, भूमिका व ध्येयधोरण विसंगत नसल्याचे विधान भाजपचे दिग्गज नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे महायुतीत सहभागी होणार तर नाही ना? असा विचार अनेकांना पडला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला संपविण्यासाठी भाजप तोडीला तोड म्हणून राज ठाकरे यांना जवळ करू शकते, असे आता सांगण्यात येत आहे. भाजप-शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यात बिनसल्यानंतर भाजप-मनसे एकमेकांचे गोडवे गात नसले तरी त्यांनी एकमेकांची उणीदुणी काढणे जवळपास बंदच केले आहे. अशात फडणवीस यांनी शनिवारी (ता. 9) केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीत सहभागी होण्याचा ठाकरे यांचा ‘राज’मार्ग प्रशस्त झाल्याचे मानले जात आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविल्यानंतर दुखावलेले राज ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडले. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. पक्षाच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात यश मिळविण्यासाठी आपले ‘इंजिन’ बरेच इकडेतिकडे फिरविले. परंतु त्यांना अपेक्षेनुरूप सत्ताप्राप्ती झाली नाही. अशात शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जवळपास पूर्ण शिवसेनाच वेगळी झाली. त्यामुळे शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि राज ठाकरे कधीना कधी एकत्र येतील असे अनेकांना वाटत आहे. अशात फडणवीस यांनी मनसेच्या स्थापना दिनाच्या दिवशी केलेले हे विधान भाजप व मनसेचे संबंध अधिक मधूर करणारे ठरणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नागपूर येथे फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेली व्यापक भूमिका आमच्या विचारांशी विसंगत नाही. विशेषतः राज ठाकरे यांच्या प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा आम्हालाही मान्यच आहे. राज ठाकरे यांनी शनिवारी मनसेच्या 18 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाला यश मिळवून देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. दुसऱ्यांची मुले अंगावर खेळवण्याची नव्हे तर स्वतःच्या सहकाऱ्यांना मोठे करण्याची इच्छा असल्याची भावना व्यक्त केली. राज यांच्या विधानाविषयी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी मनसेची भूमिका भाजपच्या विचारांशी विसंगत नसल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रात राहून मराठी माणसांविषयी बोलणे हे योग्यच आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले. राज ठाकरे यांनी मराठी माणसांच्या हक्कांसह हिंदुत्वाविषयी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत मनसे व भाजप यांच्यात फारसे अंतर राहिलेले नाही. निवडणुकीत काय होईल सांगता येत नाही. जे काही होईल ते चर्चेअंती होईल. योग्य वेळी योग्य गोष्टी होतच असतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
महायुतीत मनसेच्या रूपात चौथा सदस्य येणार का? असा थेट प्रश्न केला असता फडणवीस यांनी तूर्तास असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले. मी कोणतेही संकेत तुम्हाला दिलेले नाहीत. केवळ तुमचे ‘डाउट क्लीअर’ केले आहेत, असे फडणवीस यांनी नमूद केले. देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावर शुक्रवारी दिल्लीत झालेली बैठक सकारात्मक झाल्याचेही सांगितले. एकाच बैठकीत सर्वच निर्णय झालेले नाहीत. परंतु जवळपास 80 टक्के चित्र स्पष्ट झाल्याचे त्यांनी म्हटले. 20 टक्के काम अजूनही सुरू आहे. तेदेखील फोनवरून होत आहे. या प्रकरणी लवकरच सर्वकाही स्पष्ट होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.