Dhairyavardhan Pundkar & Anup Dhotre Google
विदर्भ

Vanchit Vs BJP : अकोल्यात वंचित-भाजपचं तुंबळ मेसेजयुद्ध; अनुप धोत्रेंबद्दल आक्षेपार्ह विधान

जयेश विनायकराव गावंडे

Political controversy in Akola : अकोला पश्चिमचे भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर आठच दिवसांत भाजपच्या काही नेत्यांनी एकत्र येत डाबकी रोड रेल्वे उड्डाणपुलाचं घाईत लोकार्पण केलं. यासंदर्भात आता वंचित बहुजन आघाडी व भाजपमध्ये तुंबळ मेसेजयुद्ध सुरू झालंय. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी लालाजींचं निधन होऊन आठ दिवसही झाले नसताना लोकार्पणाची घाई काय होती, असा आक्षेप घेतला होत. पुंडकर यांच्या आरोपांना भाजप खासदार संजय धोत्रे व आमदार गोवर्धन शर्मा यांचे सुपुत्र अनुप धोत्रे व अनुप शर्मा यांनी सोमवारी (ता. १३) त्यांना प्रत्युत्तर दिले.

अनुप शर्मा यांचं पुंडकर यांच्या आक्षेपांवरील उत्तर अत्यंत साधं होतं. परंतु अनुप धोत्रे यांच्या प्रत्युत्तरामुळं चिडलेले पुंडकर यांनी आता त्यांची लायकीच काढलीय. इतकच नव्हे तर धोत्रेंवर व्यक्तिगत शाब्दिक हल्लाही केलाय. (Dhairyavardhan Pundkar of Vanchit Bahujan Aaghadi of Akola Attacks Again on BJP Targets MP Sanjay Dhotre's Son Anup Dhotre)

भाजपच्या प्रत्युत्तरानंतर पुंडकर यांनी धोत्रे यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. ‘अकोला जिल्ह्याच्या विकासात ज्यांनी भोपळा मिळवलाय आणि केंद्रात-राज्यात सत्ता असूनही एमआयडीसीमध्ये एक साधा प्रकल्पही २० वर्षांत जे सुरू करू शकले नाही, त्यांची वंचितच्या सत्तेबद्दल बोलण्याची लायकी नाही’, असं पुंडकर यांनी व्हायरल केलेल्या मॅसेजमध्ये म्हटलंय. ‘वंचितनं धर्माचं राजकारण कधीही केलेलं नाही, करणार नाही. पक्षात कवडीची किंमत नसणाऱ्या आणि भविष्यात सत्ता घरातच राहिली पाहिजे अशा कुत्सित आणि सरंजाम विचारांच्या अनुप धोत्रे सारख्या XXXX आणि कर्तृत्वशून्य व्यक्तीनं गलिच्छ राजकारणाबद्दल बोलूच नये’, अशी जहरी टीकाही पुंडकर यांनी केलीय.

‘गलिच्छ राजकारण आणि राजकारणाची सुरुवात त्यांच्याच घरातून सुरू झाली आहे’, असा थेट व्यक्तिगत हल्लाही पुंडकर यांनी धोत्रे यांच्यावर केलाय. यासंदर्भात बोलताना पुंडकर म्हणाले की, आपल्या घरातच सत्ता राहिली पाहिजे, यासाठी काही लोक पक्षात अनुप धोत्रे यांना पुढंपुढं करायला लावत आहेत. स्वत:ही पुढंपुढं करीत आहेत. त्यांना पक्षात काडीचीही किंमत नाही. जातीचं राजकारण तेच करत आहेत. आम्ही फक्त एवढा प्रश्न विचारला की, आमदार गोवर्धन शर्मा सर्वच राजकीय पक्षासाठी प्रिय होते. आजही आहेत. त्यांची बरोबरी कुणी करूच शकत नाही. असं असताना लोकार्पणाची घाई काय होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकार्पणाचा कार्यक्रमही शासकीय नव्हता. लोकांसाठी पूल तसाच खुला करता आला असता. त्यासाठी चमकोगिरी करण्याची काहीच गरज नव्हती, मग कुणाला हे सिद्ध करायचं होतं की पूल आपल्यामुळं दिलेल्या शब्दात व वेळेत झाला, असा प्रश्न पुंडकर यांनी उपस्थित केला. नेमका रोष कुणावर आहे, कुण्या दोन-एक नेत्यांवर की भाजपवर असा प्रश्न विचारला असता पुंडकर म्हणाले की, या संपूर्ण प्रकारावर. पक्षातील एखाद्या ज्येष्ठ नेत्याचं निधन झाल्यानंतर मोठ्यात मोठे पक्ष कार्यक्रम स्थगित करतात. आठ वर्ष पूल झाला नव्हता तर आणखी आठ दिवसांनी लोकार्पण झालं असतं, तर कुठं बिघडलं असतं. बरं कार्यक्रम शासकीय नव्हताच. त्यामुळं कार्यक्रम न घेताही पूल खुला करता आला असता, ती लालाजींना श्रद्धांजली नसती का? लालाजींसाठीच ही श्रद्धांजली होती तर चमकोगिरी करणाऱ्या नेत्यानं तिथं लालाजींचा साधा फोटोही ठेवला नाही. लालाजींचा साधा उल्लेखही नव्हता. हा प्रकार म्हणजे पूर्णत: असंवेदनशीलता आहे. त्यामुळं त्यावर जाहीर टीका केली. यातून ज्याला जे कळायचं ते कळलय, असे ते म्हणाले.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT