Nagpur News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम सध्या आक्रमक भूमिकेत आहे. त्यांनी थेट भाजपला अंगावर घेतले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकही जागा मिळणार नाही असेही त्यांनी भाजपला ठणकावून सांगितले आहे. मंत्रिमंडळाच्या प्रतीक्षेत असताना त्यांची नियुक्ती गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठावर केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने त्यांच्या नावाचा प्रस्ताव विधिमंडळ सचिवालयाकडे पाठवण्यात आला आहे. आता धर्मराव बाबा आत्राम(Dharmarao Baba Atram) यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बाबा आत्राम यांनीसुद्धा शरद पवार यांना सोडचिठ्ठी दिली होती. महायुतीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात ते अन्न व नागरी पुरवठामंत्री होते. महायुतीची पुन्हा सत्ता आल्यानंतर गडचिरोलीच्या दुर्गम भागातून बाबा आत्राम मंत्रिमंडळात राहतील असेच सर्वांना वाटत होते. मंत्रिमंडळात समावेश व्हायच्या आधीच बाबा आत्राम यांनी गडचिरोलीच्या पालकमंत्री पदावर दावासुद्धा ठोकला होता. यावेळी त्यांनी आता दुसऱ्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वीकारणार नाही अशी घोषणाही केली होती.
गडचिरोलीला स्टील सिटी करायचे असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जिल्हा आपल्याकडे ठेवण्याचा आधीच निर्णय घेतला होता. दुसरीकडे बाबा आत्राम यांना मंत्रिमंडळातूनच डच्चू देऊन त्यांचा पालकमंत्रीपदावरचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने संपवून टाकला.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ज्येष्ठ मंत्र्यांची नाराजी ओढवू नये यासाठी अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला मंत्रिमंडळाच्या विस्तार होताच जाहीर केलं. सर्वांना संधी असे सांगून त्यांनी नाराज झालेल्यांना अडीच वर्ष थांबण्याचा सल्ला दिला. त्यानुसार बाबा आत्राम यांनी आपण अडीच वर्ष प्रतीक्षा करणार असल्याचे सांगितले आहे.
राज्य सरकारचा एक वर्षाचा कालावधी संपत आला असताना आत्राम यांना गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने नियुक्त केले जाणार आहे. आक्रमक स्वभावाच्या बाबा आत्राम यांना हे पद कितपत स्वीकारतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र,धर्मराव बाबांना मिळालेली ही संधी म्हणजे भाजपशी पंगा घेतल्याचं बक्षीस आहे की अडीच वर्षांनंतर महायुती सरकारमधील मंत्रिपदासाठीचा पत्ता कट केला ,याची जोरदार चर्चा सुरू आहे.
आत्राम यांच्यासोबत माजी मंत्री राजकुमार बडोले यांची महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठावर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पक्षाने दिला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राजकुमार बडोले हे त्यांच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय मंत्री होते. त्यानंतर ते पराभूत झाले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. ते निवडूनसुद्धा आले आहे. त्यांचा अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादीकडे गेला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.