BJP
BJP sarkarnama
विदर्भ

शिस्तबद्ध भाजपत रंगला वाद : एकाच प्रश्नावर, एकाच शहरात दोन नेत्यांचे दोन स्वतंत्र मोर्चे

गजानन काळुसे

सिंदखेड राजा (बुलडाणा) : सिंदखेड राजा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपच्या (BJP) वतीने मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. पहिला मोर्चा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बसून शासना विरोधात आंदोलन करतांना पहायला मिळाला. तर दुसरा मोर्चा भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ (Vinod Wagh) यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालया पासून ते उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत झाला. त्यामुळे शहरात व मतदारसंघात भाजपच्या दोन मोर्चाच्या गटबाजीची चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली. भाजपच्या आंदोलनामध्ये गटबाजी चव्हाट्यावर आल्यामुळे शिस्तबद्ध पक्षामध्ये चालले तरी काय? असा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे. त्यामुळे काही वेळेसाठी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झाला होता.

सिंदखेड राजा मतदार संघातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्ना ऐवजी आंदोलनामध्ये गटबाजीच जास्त पाहायला मिळाली. सुरुवातीला एका गटामध्ये माजी आमदार तोतारामा कायंदे (Totaram Kanyade) यांच्यासह २५ ते ३० कार्यकर्त्याच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर बसुन भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे सुरु होती. त्यांनाच भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांच्यासह शेकडो नागरिकांसह शासनाच्या विरोधात घोषणा देत उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये दाखल झाले. यावेळी काही वेळेसाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

एका गटाचे खाली बसलेले नेते व कार्यकर्ते दुसऱ्या मोर्चा कडे टक लावून पाहत होते. त्यामुळे मतदारसंघात दोन आंदोलनाची चर्चा चांगलीच रंगली. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये दुफळी पाहायला मिळाली. त्यामूळे भविष्यात कार्यकर्त्यांनी कोणाच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे, अशा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे.

सिंदखेड राजा मतदारसंघातील वरिष्ठ नेत्यांमध्ये समन्वयाची गरज निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असलेल्या आंदोलनामध्ये दोन गट पाहायला मिळाले. एका गटामध्ये माजी आमदार तोताराम कायंदे तर दुसरीकडे विनोद वाघ यांची रॅली. त्यामुळे मतदारसंघांमध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT