Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Assembly Election 2024 : विधानसभेला उद्धव ठाकरेंकडे 288 उमेदवार तरी आहेत का?

Uday Samant On Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत चांगला उत्साह संचारला आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही पक्षाची मशाल पेटवण्यासाठी ठाकरे गटाकडून राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे.

Rajesh Charpe

Nagpur News, 17 July : लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत चांगला उत्साह संचारला आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही पक्षाची मशाल पेटवण्यासाठी ठाकरे गटाकडून राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे.

ठाकरेंकडून मतदारसंघाची चाचपणी सुरु असल्याच्या मुद्द्यावरुन शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंना डिवचलं आहे. ठाकरेंकडे लढायला 288 उमेदवार आहेत का हे चाचपणी केल्यानंतरच समोर येईल असा टोला सामंत यांनी लगावला.

सामंत हे गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघातील सूरजागड इस्पात प्रकल्पाच्या भूमिपजूनसाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसंच ठाकरेंचा स्वबळावर लढण्याचा विचार सुरु असण्याची शंका देखील त्यांनी यावेळी उपस्थित केली. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मनात स्वबळावरसुद्धा लढायचा विचार सुरू असेल. मात्र तो त्यांचा निर्णय आहे. आपण त्यात कशाला पडायचे."

शेकापचे जयंत पाटील पराभूत झाल्याने कोणी महायुतीला मतदान केलं याचे पडसाद विधानसभेत दिसतील. जयंत पाटील यांची मतं फुटणार असे डोळ्यासमोर दिसत होते. तरीही एका चांगल्या नेत्याला संपवण्याचे काम महाविकास आघाडीने एकत्रितरीत्या केल्याचा आरोप सामंत यांनी यावेळी केला. तसंच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) महातुतीतून बाहेर जाणार नसल्याचंही सामंत यांनी सांगितलं.

ते म्हणाले, "आरक्षणावरून राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू नये याकरिता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी भेटीत काय चर्चा झाली हे स्पष्ट केले आहे. यावरून ते नाराज आहेत, महायुतीला सोडचिठ्ठी देणार असा तर्क लावणे चुकीचे असून ते कुठेही जाणार नाहीत."

गडचिरोली जिल्ह्याची ओळख उद्योग नगरी

सूरजागड प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारक असा आहे. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठीसुद्धा तितक्यात महत्त्वाचा आहे. दावोस करारावर टीका केली जात होती. त्याला एक प्रकारचे उत्तर या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळत आहे. गडचिरोली नक्षलवादी जिल्हा अशी ओळख असलेली पुसून उद्योग नगरी करण्याचा हा प्रयत्न आहे.

गडचिरोलीसाठी धर्मराव बाबा आत्राम यांचे मोठे योगदान आहे. 10 हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. गडचिरोलीमध्ये 75 टक्के पेक्षा जास्त स्थानिक लोकांना काम मिळेल. उद्योगांमध्ये स्थानिक लोकांना रोजगार द्यावा असा कायदा नाही. मात्र ज्या गावात, ज्या विभागात प्रकल्प येतो तेथील स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे तसा नियम असल्याचंही उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Edited By Jagdish Patil

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT