Ravi Rana
Ravi Rana Sarkarnama
विदर्भ

रॅलीदरम्यान जयस्तंभ चौकात आमदार रवी राणांना आली भोवळ

अरुण जोशी

अमरावती : महानगरपालिकेचे (Municipal Corporation) आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकली, त्या दिवशी बडनेऱ्याचे आमदार रवी राणा दिल्लीत होते. दरम्यान त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ट्रान्झीट बेल मिळवून ते आज अमरावतीमध्ये आले. त्यानंतर समर्थकांनी काढलेल्या रॅलीमध्ये सहभागी झाले. रॅली जयस्तंभ चौकात आली असताना ते भोवळ येऊन पडले.

समर्थकांच्या उपस्थितीत आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी इर्वीन चौकातून रॅलीला सुरुवात केली. मालवीय चौक मार्गाने जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या पुतळ्याला राणांनी हारार्पण केले. रॅली संपल्यानंतर तेथून परत जात असताना अचानक त्यांना भोवळ आली. त्यानंतर थोड्याच वेळाने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी (Doctor) रवी राणा यांच्या सर्व प्रकारच्या तपासणी केल्या. राणा यांना चक्कर आल्याने ते बेशुद्ध झाले होते. तर सकाळपासून त्यांनी जेवण न केल्याने त्यांचा रक्तदाब कमी झाला होता. एक - दोन दिवस त्यांना विश्रांतीचा करण्याची आवश्यक आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. आमदार राणा यांची प्रकृती स्थिर असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

आज अमरावतीत (Amravati) येताच युवा स्वाभिमान पक्षाच्या समर्थकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. आमदार राणा आज सकाळी दिल्लीवरून नागपूर विमानतळावर दाखल झाले. तेथेही त्यांच्या समर्थकांनी नागपूर विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते मोटारीने दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ते अमरावतीत पोचले. येथील इर्वीन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केल्यानंतर शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी पायी रॅली काढली. इर्वीन चौक, कॉटन मार्केट, मालवीय चौकासमोरून, जयस्तंभ चौकात रॅली पोचली. येथे या फेरीचा समारोप झाला. यावेळी अनेकांनी राणांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

जामीनाचा अर्ज दाखल झाला नाही..

आमदार राणा यांचा जामीन अर्ज अद्याप स्थानिक न्यायालयात दाखल झालेला नाही. उर्वरित चौघांच्याही जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. आमदार रवी राणांच्या जामिनावर निर्णय व्हायचा आहे.

-अ‍ॅड. दीप मिश्रा, बचाव पक्षाचे वकील.

हार घालण्याची अशीही धडपड..

आमदार राणा यांना भोवळ आल्यानंतर लगेच कार्यकर्त्यांनी त्यांना सावरले आणि आधार देत त्यांच्या गाडीपर्यंत नेले. गाडीत बसल्यानंतर ते थोडेफार सावरले. गाडी निघताच एका उत्साही कार्यकर्त्याने गाडीच्या खिडकीतून त्याही परिस्थितीत आमदार राणा यांना हार घातला, याची चर्चा नंतर बराच वेळ तेथे सुरू होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT