Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

DYCM Ajit Pawar News: अजित पवारांना राहावे लागेल कॉटेजमध्ये, दोन उपमुख्यमंत्री झाल्याने उद्भवली अडचण !

Nagpur Political News: अजित पवारांसाठी स्वतंत्र बंगल्याची सोय नाही.

सरकारनामा ब्यूरो

There is no separate bungalow facility for Ajit Pawar : मुख्यमंत्र्यांप्रमाणेच उपमुख्यमंत्र्यांसाठी स्वतंत्र शासकीय बंगला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच उपमुख्यमंत्र्यांची दोन पदे निर्माण झाली. त्यामुळे नव्याने उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलेल्या अजित पवारांसाठी स्वतंत्र बंगल्याची सोय नाही. रविभवनमधील कॉटेजमध्येच त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. (Deputy Chief Minister post again went to Ajit Pawar)

राज्याच्या राजकारणात गेल्या साडेतीन वर्षांत अतिशय नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी सत्तास्थापन करीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर दोन, तीन दिवसांतच चक्र फिरले. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेत आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. तर उपमुख्यमंत्रिपद पुन्हा अजित पवारांकडे आले.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले. भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यावेळी उपमुख्यमंत्रिपद भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करून आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ते सामिल झाले. यावेळीही त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले. त्यामुळे राज्यात उपमुख्यमंत्र्यांची दोन पदे झाली.

नागपुरात मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी हे शासकीय निवासस्थान आहे. तर उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी बंगला आहे. हा बंगला देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांसाठी एकच शासकीय निवासस्थान आहे. दोन उपमुख्यमंत्री झाल्याने प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे. राष्ट्रपती दौऱ्याच्या वेळी त्यांच्यासाठी रविभवन येथील एक कॉटेज राखीव ठेवण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी स्वतंत्र बंगलाच नसल्याचे चित्र सध्या तरी आहे.

आतापर्यंत नऊ उपमुख्यमंत्री..

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून उपमुख्यमंत्रिपदाची निर्मिती करण्यात आली. राज्यात १९७८ मध्ये प्रथम उपमुख्यमंत्री पदाची निर्मिती करून नाशिकराव तिरपुडे यांच्याकडे हे पद आले. त्यानंतर आतापर्यंत नऊ जणांकडे उपमुख्यमंत्रिपदाची धुरा आली. यात सर्वाधिक पाच वेळा उपमुख्यमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे राहिले. यातील तीन वेळा उपमुख्यमंत्रिपद त्यांना याच साडेतीन वर्षाच्या काळात मिळाले. दोनदा छगन भुजबळ उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान होते.

कॉटेज करणार तयार..

नागपुरातील (Nagpur) देवगिरी बंगला देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला असून त्यांच्याकडून येथे एक कार्यालयही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे फडणवीस (Devendra Fadanvis) नसताना अजित पवार (Ajit Pawar) आल्यास त्यांना हा बंगला देता येणार नाही. त्यामुळे एक कॉटेजच त्यांच्यासाठी तयार करण्याच्या तयारीत बांधकाम विभाग असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT