Buldhana political news : प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून भाजप महायुती सरकारविरोधात कर्जमाफीवरून आक्रमक झालेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी ते सातत्याने लावून धरताना त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना, आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका, असे विधान केलं आहे.
यावरून राज्यातील राजकारण तापलं असताना, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलढाणा इथले आमदार संजय गायकवाड यांनी बच्चू कडू यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना, त्यावर वरचढ भाषा वापरली आहे. त्यामुळे वादाला आणखी फोडणी बसली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना (Shivsena) पक्षाचे बुलढाणा इथले आमदार संजय गायकवाड यांनी बच्चू कडू यांच्या आमदार कापण्याच्या भाषेवर प्रतिक्रिया देताना त्यांच्यापेक्षा वरचढ भाषा केली. अतिवृष्टीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना दिवाळी सणात सहानुभूतीपूर्वक विचार करण्याऐवजी त्यावर मीठ चोळण्याची भाषा केली आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, '288 आमदारांना जरी कापलं तरी शेतकऱ्यांचा संकट दूर होणार आहे का?,' असा प्रतिप्रश्न केला. संजय गायकवाड यांच्या या प्रतिप्रश्नाने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधी या शब्दाचा अर्थ संजय गायकवाड यांना समजत नाही, असं वाटतं, लोकांच्या समस्यांवर, उपाययोजना करण्यासाठी लोकांनी त्यांचा प्रतिनिधी विधिमंडळात पाठवलेला असतो. पण संजय गायकवाड यांचे हे विधान म्हणजे, आमदारकी घरचीच, असे झाले आहे, असा अर्थ आता काढला जाऊ लागला आहे.
आमदार गायकवाड पुढे म्हणाले, "शेतकऱ्यांची ही दशा करायला आमदारच जबाबदार आहेत का? राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. आमदारांना कापून तुम्ही काय लोकशाहीचा गळा घोटणार आहात? त्याला काय कापण्यासाठी निवडून दिलं का जनतेने? हा सर्व प्रसिद्धीसाठी खेळ असतो." अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी करू नये, असा सल्ला देखील बच्चू कडू यांना आमदार गायकवाड यांनी दिला.
बच्चू कडू बुलढाणा इथं शेतकरी परिषदेत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी, "शहरातले आमदार परवडले, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. अरे तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा, त्याला लाथ तरी मारता येते. शेतकऱ्याला आपण जर विचारलं, तर तू काय करतो, तर त्याला काहीच येत नाही. अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका. हा कार्यक्रम जर सुरू केला, तर गुडघ्यावर येईल सरकार!"
सर्वात जास्त मेहनत आमची आणि आपल्याला हे लुटतात, असा हल्लाबोल सरकारवर करताना, सरकार हे डुकरासारखं आहे, डुक्कर परवडलं पण सरकार नाही, अशा तीव्र शब्दात बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.