Raheri Village Sarkarnama
विदर्भ

Maratha Reservation : आमच्या गावात येऊन अपमान करून घेऊ नका; बुलडाणा जिल्ह्यात फलक

No Entry to Politician's : मराठा आरक्षणासाठी विदर्भात प्रथमच राहेरीत गावबंदी

प्रसन्न जकाते

गजानन काळुसे

Buldhana District News : आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्याने राज्यभरात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळेपर्यंत पाण्याचा घोटही घेणार नाही, अशी प्रतिज्ञाच केल्यानं सरकारपुढील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे संतापलेल्या मराठा समाजानं आता राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यास सुरुवात केली आहे. गावबंदीचे हे लोण आता विदर्भातही पोहोचले आहेत. तशा आशयाचे फलकही बुलडाणा जिल्ह्यातील गावाबाहेर झळकले आहेत. खासदार, आमदार, नेते, पुढारी यांनी गावात येऊ नये. विनाकारण आमच्या गावात येऊन अपमान करून घेऊ नका, असा संतापजनक इशारा गावकऱ्यांनी या फलकांवरून दिला आहे. (Entry ban for leaders in Raheri village of Buldhana district)

राजमाता जिजाऊ यांचे मातृतीर्थ असलेला तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंदखेडराजातील तालुकाक्यामध्ये राहेरी बुद्रुक गावात नेत्यांना प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. विदर्भात राजकीय नेत्यांना गांवबंदी करणारे राहेरी हे त्यामुळे पहिलेच गाव ठरल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत गावबंदीचे लोण मराठवाड्यातील गांवापुरते मर्यादित होते. परंतु विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातही ही धग पोहोचल्याने आता राजकीय मंडळींना चांगल्याच अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

राहेरीच्या प्रवेशद्वारावर ग्रामस्थांनी मोठा फलक लावला आहे. फलकाजवळ ठिय्या दिल्यानंतर गावाच्या वेशीजवळच गावकरी लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. चुकीनेही एखादा राजकीय पुढारी गावात आलाच, तर काय करायचे हे आंदोलकांनी आधीच ठरविले आहे. राहेरीप्रमाणे आता विदर्भातील इतर गावांमध्येही राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे, अशी या सर्व आंदोलकांची मागणी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासंदर्भात राहेरीचे ग्रामस्थ मदन देशमुख यांनी सांगितले की, ‘जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याच पक्षाचा नेता गावात येऊ देणार नाही. गावबंदी मोडत कुणी वेशीच्या आत आलेच तर त्याचा जाहीर अपमान करण्यात येईल. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला राहेरीतील ग्रामस्थांचा पाठिंबा आहे.’ ग्रामस्थांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सिंदखेडराजा तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. राहेरीत करण्यात आलेल्या गावबंदीची माहिती पोलिस आणि महसूल प्रशासनाने घेतली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाकडे बघता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बुलडाणा जिल्हा प्रशासनही सध्या ‘अलर्ट मोड’वर आहे. सध्या गावात शांतता असली तरी राज्य सरकारबद्दल या गावातील लोकांच्या चेहऱ्यांवर संतापाचे स्पष्ट भाव दिसत आहेत.

(Edited by : Prasannaa Jakate)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT