Ghagat Singh Koshyari
Ghagat Singh Koshyari Sarkarnama
विदर्भ

Governor : राज्यपालांची हकालपट्टी करा म्हणत शेवटच्या दिवशीही विरोधक पायऱ्यांवर...

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Assembly Winter Session : हकालपट्टी करा, हकालपट्टी करा राज्यपालांची हकालपट्टी करा, अशा घोषणा देत विरोधक आज शेवटच्या दिवशी पुन्हा पायऱ्यांवर आले. राज्यपाल हटावची मागणी करीत विरोधक आक्रमक झाले आहेत. विविध घोषणा देऊन विरोधकांनी विधान भवन परिसर दणाणून सोडला.

राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्‍यारी (Bhagatsingh Koshyari) काळी टोपी घालतात. विरोधकानी काळ्या टोप्या उंचावत राज्यपालांचा निषेध केला. राज्यपाल गेल्या काही दिवसांपासून बेताल वक्तव्य करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, (Chhatrapati Shivaji Maharaj) महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या थोर प्रभृतींविषयी त्यांनी चुकीची वक्तव्ये केली आहेत.

आणखी एका कार्यक्रमात त्यांनी मराठी माणसाचा अवमान होईल, असे वक्तव्य केलेले आहे. राज्यपाल सध्या सारवा सारव करीत असून चुक झाली असेल तर क्षमा मागतो, असे म्हणतात. चुक झाली असेल तर या त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय होतो. ज्या मराठी माणसांच्या महाराष्ट्रात, मुंबईत रहायचे त्यांच्याच स्वाभिमानाला धक्का द्यायचा असे हे कृत्य आहे. मराठी माणसाच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात असल्याचे यावेळी आंदोलक आमदार म्हणाले.

महाराष्ट्राचे बुजगावणे हाकलून द्या अशी मागणी विरोधकांनी केली. ‘राज्यपाल झाले भाज्यपाल’, ‘महाराष्ट्राचे एकच म्हणणे, द्या हाकलून हे बुजगावणे’, ‘राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवा’, ‘चोर है, चोर है, राज्यपाल चोर है’ च्या घोषणाबाजी करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान भवन परिसर दणाणून सोडला. आंदोलनकर्त्यांनी हातात काळ्या टोप्या फिरवत महाराष्ट्राचे बुजगावणे त्वरीत हाकला, अशी जोरदार मागणी केली. तसेच शेतकरी जसे शेतात बुजगावणे उभारतात, तसेच विधान भवनाच्या पायऱ्यांवर बुजगावणे मांडून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करीत सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

बुजगावणे हे शेतमालाच्या संरक्षणाकरता शेतात उभारले जातात. पाखरांनी शेतमाल खाऊ नये, असा त्यामागचा उद्देश असतो. राज्यातदेखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या रुपात दोन बुजगावणे आहेत. यांच्यासमोर गायरान खाल्ली जात आहे, भूखंड चोरले जात आहे, महापुरुषांचा अपमान केला जात असून हे बुजगावणेरुपी सरकार गप्प बसलयं, अशी जळजळीत टीका विरोधकांनी केली. आंदोलनकर्त्या आमदारांच्या घोषणाबाजीतून राज्यपालांबाबत त्यांच्यामध्ये किती असंतोष आहे, हे दिसून आले. आंदोलन संपल्यानंतर त्या बुजगावण्याला लात मारून ते खाली पाडण्यात आले. या आंदोलनात विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार रोहित पवार, वैभव नाईक, विकास ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांचा सहभाग होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT