Ravikant Tupkar
Ravikant Tupkar Sarkarnama
विदर्भ

आधी समजावून सांगा, नाही तर ‘त्यांच्या’ कानाखाली वाजवा, तुपकर ठाम !

सरकारनामा ब्यूरो

बुलडाणा ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी वाशीम जिल्हा दौऱ्यावर असताना पदाधिकारी मेळाव्यात तसेच प्रसार माध्यमांसमोर बोलताना 'गावात वीज कापायला आलेल्या कर्मचाऱ्यांना आधी समजावून सांगा आणि नाही ऐकले तर त्यांच्या कानाखाली वाजवा' असे आक्रमक विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

नाशिकमध्ये तुपकरांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज्यात इतरही ठिकाणी तक्रारी दाखल केल्या जाणार असल्याचे वीज कर्मचारी संघटनेकडून बोलले जात आहे. यामुळे राज्यात आता महावितरण आणि 'स्वाभिमानी' यांच्यात वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविकांत तुपकर हे आक्रमक नेतृत्व आणि वक्तृत्व म्हणून परिचित आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुपकर नेहमीच आक्रमक भूमिका मांडतात. दरम्यान गेल्या आठवड्यात ते वाशीम जिल्हा दौऱ्यावर असताना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आणि प्रसार माध्यमांसमोर बोलताना त्यांनी महावितरण कर्मचाऱ्यांबाबत आक्रमक विधान केले होते.

थकीत वीजबिलापोटी महावितरण ग्रामीण भागात सर्वसामान्य ग्राहकांचे वीज कनेक्शन कट करीत आहे, यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहेत, या विषयीच्या वाढत्या तक्रारी पाहता 'गावात महावितरणचे कर्मचारी वीज कट करायला आल्यास त्यांना आधी समजावून सांगा आणि नाहीच ऐकले तर त्यांच्या कानाखाली वाजवा' असे आक्रमक आणि चिथावणीखोर विधान तुपकरांनी केले. इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच सोशल मीडियावर त्यांच्या विधानाचे वृत्त राज्यभर पसरले आणि त्यांच्या या विधानाचे पडसाद आता राज्यात उमटण्यास सुरुवात झाली आहे.

उपनगर पो.स्टे. नाशिकरोड येथे महाराष्ट्र राज्य वीज वर्कस फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी तुपकरांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. तुपकरांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे काही समाजकंटक महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याची दाट शक्यता असल्याने वीज कर्मचारी आणि अभियंत्यांमध्ये भिती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे तक्रारीत नमूद आहे.

पोलिसांनी तूर्तास सदर तक्रार चौकशीवर ठेवली आहे. या तक्रारीनंतर आता राज्यात इतर ठिकाणी देखील तुपकरांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी देण्याचे सत्र सुरू होण्याचे संकेत आहेत, त्यामुळे रविकांत तुपकर अर्थात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महावितरण यांच्यात राज्यात आता नवा वाद सुरू झाल्याचे दिसून येत आहे. हा वाद आता कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मी विधानावर ठाम : तुपकर

शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी आपण लढत आहोत. आजवर अनेक तक्रारी झाल्या आणि अनेक गुन्हेही आमच्यावर दाखल झाले, त्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांच्या या तक्रारीला आपण महत्त्व देत नाही. महावितरणच्या जाचाने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे, त्यांच्या भावना पाहता सदरचे विधान केले असून या विधानावर आपण ठाम असल्याचे मत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले आहे. शेकडो तक्रारी आणि गुन्हे दाखल झाले तरी सर्वसामान्यांसाठी आपण लढतच राहणार असल्याचेही तुपकरांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT