Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis News: एकाने गाय मारली, म्हणून दुसऱ्याने वासरू मारावे, असं होत नाही, असं का म्हणाले फडणवीस?

Budget Session: तर विधिमंडळावर कुणाचा विश्‍वास राहणार नाही.

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadanvis on Sanjay Raut in Budget Session : खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सदस्यांच्या भावना तीव्र आहेत. संजय राऊत जे बोलले, ते मीसुद्धा ऐकलेले आहे. कुणी विधिमंडळाला कुणी चोरमंडळ म्हणत असेल, तर मग येथे काम कशाला करायचं. यापेक्षा घरी गेलेलं बरं, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.

फडणवीस म्हणाले, हा केवळ सत्तापक्षावर झालेला आरोप नाही, तर संपूर्ण विधानमंडळावर आरोप आहे. सर्वांनाच चोर म्हणणे सहन करण्यासारखे नाही. यशवंतराव चव्हाणांपासून जी परंपरा आहे, त्याला छेद देण्याचा हा प्रयत्न आहे. मोठे मोठे नेते या विधानमंडळाने पाहिले. या सभागृहाचे नाव देशभरात सन्मानाने घेतले जाते. सर्वोत्तम विधानमंडळ हे महाराष्ट्राचे आहे. चोर म्हणण्याचा अधिकार जर कुणाला दिला, तर विधिमंडळावर कुणाचा विश्‍वास राहणार नाही.

हक्कभंग हे आयुध दिले गेले आहे. न्यायालयाच्या विरोधात बोलल्यास कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतो. तसेच उद्या विधानमंडळाच्या विरोधात कुणीही काही बोलेल, म्हणून हक्कभंग म्हणजे कंटेम्प्ट ऑफ विधिमंडळ आहे. कुणी गाय मारली, म्हणून दुसऱ्याने वासरू मारावे, असे मुळीच नाही. उद्धव ठाकरेदेखील विधिमंडळाचे सदस्य आहेत. संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार तेसुद्धा चोर ठरतात. मग उद्धव ठाकरे चोर आहेत, हे राऊतांना मान्य आहे का, असा सवाल फडणवीसांनी केला.

संजय राऊत साधे नेते नाहीत, ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मोठ्या सभागृहाचे सदस्य असे बोलतील, तर कसे सहन करायचे. सदस्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे याबाबतीतचा निर्णय सभापतींनी घ्यावा. आज आपण सगळे मिळून निषेध करणार नसू, तर उद्या हजारो संजय राऊत तयार होतील. विधिमंडळाला रोज चोर म्हणतील, रोज अपमान करतील. हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. राऊतांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. विधानमंडळ नेमकी काय कारवाई करते, याची प्रतीक्षा आहे, असे फडणवीस म्हणाले.

आधीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटासमोरील अडचणी कमी नाहीत. त्यात संजय राऊतांनी (Sanjay Raut) विधिमंडळाला चोर संबोधून गटाला आणखी अडचणीत टाकले आहे. सत्ताधारी सर्व सदस्य त्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत आणि राऊतांना अटक करण्याची मागणी करीत आहेत. तसंही संजय राऊतांनीच उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) अडचणीत आणले, असे बोलले जाते. आजच्या त्यांच्या वक्तव्याने विरोधकांच्या त्या आरोपाला बळ मिळत आहे. आता ठाकरे गट राऊतांचा बचाव कशा पद्धतीने करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT