Chandrapur OBC Andolan : ओबीसी बांधवांच्या विविध समस्या घेऊन रवींद्र टोंगे हे गेल्या 11 सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. तब्बल दहा दिवस लोटूनही सत्ताधा-यांनी व प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही. दरम्यान, गुरुवारी आंदोलनकर्ते टोंगेंची तब्येत खालावली होती. यानंतर आज संतापलेल्या राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी टोंगेंना समर्थन देण्यासाठी नेत्याचे मुखवटे लावले व मुंडन आंदोलन केले, तर गांधी चौकात याच पद्धतीने भीक मांगो आंदोलन करून शासन प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
रवींद्र टोंगे यांच्या मागणीला समाजातून मोठा पाठिंबा मिळत असताना प्रशासन व सत्ताधारी मात्र अद्यापही या आंदोलनाप्रती गंभीर झाले नसल्याचे चित्र आहे. ओबीसीच्या विविध मागण्यांना घेत टोंगे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनास बसले आहेत. अन्नत्यागासारखे प्रभावी आंदोलन करणाऱ्या टोंगेंकडे मात्र शासन प्रशासनाचे लक्ष नाही. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्ष व विविध नेत्यांनी हजेरी लावली टोंगे यांच्या आंदोलनाकडे मात्र गंभीरतेने बघितले जात नसल्याचा आरोप ओबीसी बांधव करत आहेत.
उपोषणकर्ते टोंगे यांची ११ व्या दिवशी प्रकृती खालावली. टोंगेंच्या जिवाचे काही वाईट झाल्यास संपूर्ण राज्यात उद्रेक होईल, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिला. गुरुवारी उपोषणस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे मुखवटे लाऊन मुंडन आंदोलन करण्यात आले. तसेच आंदोलनाची धग दिवसेंदिवस पेटत राहील, असा इशारा देण्यात आला. जय ओबीसी जय, संविधानचा नारा देत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण हाेत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचे राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग करणाऱ्या रवींद्र टोंगे यांच्या समर्थनार्थ गुरुवारी गांधी चौकातील गोलबाजारात सत्ताधारी नेत्यांचे मुखवटे घालून पदाधिकाऱ्यांनी भीक मांगो आंदोलन केले. सरकारकडे ओबीसींचे 72 वसतिगृह सुरू करण्यासाठी पैसे नाहीत ही मोठीच शोकांतिका आहे. आम्ही या सरकारचा निषेध करीत असल्याचे ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जरांगे पाटलांशी सरकारने अशी कोणती तडजोड केली याची माहिती सरकारने सार्वजनिक करावी, अशी मागणीदेखील या वेळी करण्यात आली.
या वेळी ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके, विलास माथनकर, भाविक येरगुडे, मनीषा बोबडे, प्रलय म्हशाखेत्री, अक्षय येरगुडे, गीतेश शेंडे यांची उपस्थिती होती. महेश खंगार, अंबादास वनकर, संदीप तोडसाम, दिलीप डोंगरे, कृष्णा चांदेकर, संतोष कुकडकर यांनी स्वतः चे मुंडन करत निषेध व्यक्त केला. विनायक बांगडे, नंदू नागरकर, सुभाष गौर, राजेश बेले, देवा पाचभाई, सुनीता लोढिया, वैशाली टोंगे, विजय फाले यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. टोंगे यांची प्रकृती चिंताजनक असून, शासनाने ओबीसी युवकाची तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी दिला आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.