Parinay Fuke, Devendra Fadanvis and Charan Waghmare Sarkarnama
विदर्भ

अखेर चरण वाघमारेंची तलवार मॅन, राजकीय भूकंप टळला…

चरण वाघमारे (Charan Waghmare) यांनी आपली तलवार अखेर मॅन करत माजी मंत्री आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांच्या गटासोबत मोहाड़ी नगर पंचायतीमध्ये सत्तेत सहभागी होण्याच्या निर्णय घेतला आहे.

Abhijeet Ghormare

भंडारा : गेल्या दिवसांपासून राज्यभर चर्चेत राहिलेल्या मोहाड़ी नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे होणार असलेला भाजपमधील (BJP) राजकीय भूकंप तूर्तास टळला आहे. भाजप नेते माजी आमदार चरण वाघमारे यांनी आपली तलवार अखेर मॅन करत माजी मंत्री आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांच्या गटासोबत मोहाड़ी नगर पंचायतीमध्ये सत्तेत सहभागी होण्याच्या निर्णय घेतला आहे.

आता मोहाड़ी नगर पंचायतीमध्ये भाजप बहुमतात सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राजकीय भूकंपाच्या चर्चांना विराम मिळाला आहे. यात मात्र सत्ता स्थापनेसाठी गुढग्याला बाशिंग बांधून बसलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या पुरता हिरमोड झाला आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यात मागील महिन्यात झालेल्या लाखनी, लाखांदूर व मोहाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत लाखांदूर व मोहाडी नगरपंचायतीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र मोहाड़ी नगर पंचायतीत भाजपचे दोन गट पडले होते. आमदार चरण वाघमारे यांच्या ५ नगरसेवकांचा एक गट तर आमदार डॉ. परिणय फुके यांच्या ४ नगरसेवकांचा दुसरा गट.

भाजप नगरसेवक यादोराव कुंभारे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी आघाडी नावाचा भाजपच्या ५ नगरसेवकांच्या एक गट तयार झाला. तर भाजपचा दुसरा गट ज्योतिष जयदेव नंदनवार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी विचारमंच नगर विकास आघाडी नावाचा भाजपच्या ४ नगरसेवकांचा तयार झाला. भाजपच्या दोन्ही गटांत नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू झाली होती. भाजपचे दोन वरिष्ठ नेते असलेल्या आजी माजी आमदारांत रस्सीखेच सुरू झाल्याने मोहाड़ी नगर पंचायतीची निवडणूक चुरशीची ठरली होती. स्वतः माजी आमदार चरण वाघमारे यांनी आपल्याशी दगा फटका झाल्यास जिल्हा परिषदेत भाजपच्या विरोधात कार्य करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे आमदार फुकेंच्या नगरसेवकांचा गट पिकनिकला गेल्याची तक्रार चरण वाघमारेंनी केली होती. मोहाड़ी नगर पंचायतीबाबतचा विषय नागपुरातील धरमपेठच्या बंगल्यावर गेल्याने या दोन्ही गटांत फडणवीस समेट घडवून आणतील हे जवळपास निश्‍चित झाल्याचे भाकीत ‘सरकारनामा’ने केले होते आणि अखेर सरकारनामाचे ते भाकीत खरे ठरले. बंद दाराआड झालेल्या बैठकीत माजी आमदार चरण वाघमारे यांनी नगराध्यक्षपदावर पाणी सोडून आमदार फुकेंच्या गटाला पाठिंबा देण्याचे निश्चित केले. चरण वाघमारे यांच्या ५ नगरसेवकांच्या गटाने तसे समर्थनाचे पत्र भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे आमदार फुके गटाने भारतीय जनता पार्टी विचारमंच नगर विकास आघाडी नावाने तयार केलेल्या गटाच्या छाया डेकाटे उद्या मोहाड़ी नगरपंचायतीचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.

या सर्व घडामोडींत मात्र चरण वाघमारे गटाने नगरपंचायतीमधील कोणतेही पद घेण्यास नकार दिला. फुके ह्यांच्या गटातील ४ नगरसेवकांच्या पारड्यात अध्यक्ष पद, एका नगरसेवकाला उपाध्यक्ष पद, एकाला गटनेता पद इतकेच काय तर ४ सभापती पदेही देण्याच्या निर्णय चरण वाघमारे गटाने घेतला आहे. त्यांमुळे चरण वाघमारे यांनी पक्षाच्या शब्दावर फुके गटाला समर्थन देण्याचे ठरविले असले तरी कोणतेही पद न घेता आपली नाराजी कायम असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते फडणवीस यांना मोहाड़ी नगर पंचायतीत भाजपची बहुमतात सत्ता बसविता आली खरी. पण गटांतील नाराजी शमविता आली नाही. त्यामुळे सध्यातरी भाजपमधील अंतर्गत गटबाजीला पक्ष नेतृत्वाने शांत केले आहे. आता लाखांदूर व मोहाडी नगरपंचायतीत भाजपला बहुमताने सत्ता स्थापन करणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT