Narendra Modi : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नीकटवर्तीय खासदार संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये आणखी एक भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रक्षोभक लिखाण केल्याबद्दल राऊत यांच्या विरोधात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केल्यानंतर उमरखेड पोलिसांनी गुन्हा नोंदविला. राऊत यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाच्या कलमान्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील लेखातून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रक्षोभक लिखाण केले. हे लिखाण देशविरोधी असून जातीय द्वेष पसरविण्याच्या हेतूने करण्यात आल्याची तक्रार भुतडा यांनी केली. तक्रारीसोबत लेखाचे पुरावेही जोडण्यात आलेत. पोलिसांनी प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारावर भारतीय दंड संहितेच्या कलम 153 (A), 505 (2) आणि 124 (A) अन्वये राऊत यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादींच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि सौहार्द राखण्यासाठी प्रतिकूल असे कृत्ये करणे, त्यासंदर्भात लेख किंवा बातमी प्रकाशित करणे, शब्दांद्वारे, एकतर बोलून, लिखित, चिन्हे किंवा दृश्यमान स्वरूपात अथवा प्रतिनिधित्वाद्वारे द्वेष किंवा तिरस्कार आणण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी उत्तेजित करणे, असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करणे यासाठीचे हे गुन्हे आहेत.
यापूर्वी संजय राऊत यांना 2022 मध्ये पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवुसली संचालनालयाने (ED) अटक केली होती. त्यानंतर 102 दिवस राऊत आर्थर रोड जेलमध्ये होते. जामिनावर त्यांची मुक्तता झाली होती. अशात सामनातून प्रकाशित झालेल्या लेखानंतर संजय राऊत यांच्या वाहनावर रविवारी (ता. 10) सोलापूर येथे चप्पल फेकण्यात आली होती. त्यावेळी राऊत कारमध्ये बसून होते. चप्पल फेकणाऱ्यांनी नारायण राणे जिंदाबादच्या घोषणाही दिल्या होत्या. त्यानंतर हे कार्यकर्ते पळून गेले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संजय राऊत यांच्या विरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. 2022 मध्ये स्वप्ना पाटकर यांनी त्यांच्या विरोधात मुंबईतील वाकोला पोलिस ठाण्यात बलात्कार व खुनाची धमकी दिल्याची तक्रार केली होती. पाटकर या पत्राचाळ घोटाळ्यातील साक्षीदार आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये ठाणे शहरातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात मीनाक्षी शिंदे यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील वक्तव्याचं हे प्रकरण होतं.
ऑक्टोबर 2023 मध्ये दिल्लीत राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दिप्ती रावत यांनी त्यांच्याविरोधात असभ्य भाषेचा वापर केल्याची तक्रार केली होती. मराठा क्रांती मोर्चाची खिल्ली उडविणारे व्यंगचित्र प्रकाशित केल्याबद्दल उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या विरोधात छत्रपती संभाजी नगरच्या मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात व परभणीच्या नानल पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे व भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावरही राऊत यांनी आरोप केल्यानं प्रकरण तापलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.